राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून चांगलेच वातावरण तापलेले आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे उद्या विजयी मेळावा साजरा करत आहेत. मात्र या मेळाव्याच्या आदल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिले आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी थेट गुजरातची घोषणा दिली. त्यामुळे आता मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी देखील सहभाग घेतला. या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कोणते राजकीय संकेत आहेत का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमाला स्थानिक मंत्री, लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली. त्यामुळे आता त्यांच्यावर राजकीय आरोप होतील, यात वाद नाही. या घोषणेमुळे त्यांचे कोणते राजकीय संकेत आहेत का? हे देखील अद्याप समोर आलेले नाही. मात्र या घोषणेमुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेसाठी नवीन विषय मिळाला आहे. आजच एकनाथ शिंदे जय गुजरात का म्हणाले असेल? सत्ताधारी महायुती सरकारवर गुजरात धार्जिणे असल्याचा आरोप विरोधकांच्या वतीने वारंवार केला जातो. यातच मुंबईतील अनेक महत्त्वाचे उद्योग हे गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गट करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी दिलेली घोषणा आता वादग्रस्त ठरणार आहे. आपल्या भाषणाचा शेवट करताना एकटाच शिंदे यांनी जय गुजरात असा उल्लेख केला. नेमके आजच एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात का म्हणाले असेल? या विषयी आता तर तर्क-वितर्क लावले जात आहेत. गुजरातच्या वॉशिंग मशीनचा यांच्यावर झालेला परिणाम – नाना पटोले या सरकारचा वास्तविक-पणा, महाराष्ट्राच्या मातृभूमीबद्दल आणि मातृ भाषेबद्दल या सरकारचे मत काय? हे आता स्पष्ट झाले आहे. हे सर्वजण गुजरातच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतले गेलेले आहेत. गुजरातच्या वॉशिंग मशीनचा यांच्यावर झालेला परिणाम अद्यापही उतरलेला नसल्याचे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. गुजराती नेत्यांसमोर लोटांगण घातले – किशोरी पेडणेकर जय हिंद हे आपल्या देशावरचे प्रेम आहे. जय महाराष्ट्र हे महाराष्ट्र राज्यावरचे प्रेम आहे. मात्र जय गुजरात म्हणजे हिंदी बरोबर आता गुजराती शिकणे देखील बंधनकारक होईल याची सुरुवात एकनाथ शिंदे करून देत आहेत का? असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. तुम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो असे लोकांना भासवत आहात. मात्र, त्यामध्ये जय गुजरात असा नारा कधीच बाळासाहेबांचा नव्हता, असे देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी गुजराती नेत्यांसमोर लोटांगण घातले असल्याचा आरोप देखील पेडणेकर यांनी केला आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी – जितेंद्र आव्हाड पुण्यात जाऊन एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा का दिली? हे मला समजले नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी असे म्हणतात. एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर कसे आहात ऐवजी, केम छो? असे विचारायचे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. स्वतःच्या पायावर धोंडा टाकून दुसऱ्याला खुश करणार असेल तर तुम्हाला मुबारक हो, असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. शिंदेंच्या बाबतीत शंका व्यक्त करणे म्हणजे आकाशाकडे बघून थुंकण्यासारखे – योगेश कदम एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत शंका व्यक्त करणे म्हणजे आकाशाकडे बघून थुंकण्यासारखे आहे. ज्या व्यक्तीने महाराष्ट्रामध्ये उठाव करून हिंदुत्ववादी सरकार पुन्हा आणले. महाराष्ट्राची अस्मिता टिकवली, वाढवली अशा व्यक्ती बाबत शंका व्यक्त करणे अतिशय चुकीचे ठरेल. ते राजकारण केल्यासारखे होईल. मात्र, शिंदेंवर टीका करणे अतिशय चुकीचे असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे. गुजराती समाजातील कार्यक्रमात वक्तव्य – उदय सामंत गुजराती समाजाचा कार्यक्रम होता. आपण एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर त्यांना आनंद मिळावा, ते खुश व्हावे, त्यासाठी आपण एखादा शब्दप्रयोग करतो. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी शब्दप्रयोग केला आहे. हा महाराष्ट्र काय आहे, हे शिंदे यांना माहिती आहे. तसेच महाराष्ट्राला देखील एकनाथ शिंदे काय आहेत, ते माहिती असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.