पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेवर राज्यभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली. इतकेच नाही तर शरद पवार यांनी कर्नाटक मध्ये ‘जय कर्नाटक’ अशी घोषणा दिली होती. याची आठवण देखील मुख्यमंत्र्यांनी करून दिली. मराठी भाषेचा आग्रह योग्यच आहे, मात्र दुराग्रह नको, असा सल्ला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. प्रेम कमी होत नाही… एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माननीय शरद पवार देखील कर्नाटक मधील एका कार्यक्रमात जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते. याचा अर्थ त्यांचे कर्नाटक वर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही, असे म्हणायचे का? आपण ज्या समाजाच्या कार्यक्रमात जातो त्यावेळी तसे आपण म्हणत असतो. गुजराती समाजाच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हटले म्हणजे मराठी आणि महाराष्ट्रावरचे प्रेम कमी झाले, असं होत नाही. इतका संकुचित विचार… इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. मराठी माणसे ही वैश्विक आहेत. मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला आहे. संपूर्ण भारताला देखील मराठी माणसाने स्वतंत्र केले आहे. मराठीचा भगवा झेंडा दिल्लीत लावण्याचे काम देखील महाराष्ट्रातील मराठी माणसाने केले आहे. त्यामुळे इतका संकुचित विचार जर कोणी करत असेल, तर ते चुकीचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. विरोधकांचा लोकांशी टच नाही विरोधकांकडे मुद्देच नाहीत. त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही. लोकांच्या मनात काय? हे देखील त्यांना माहित नाही. त्यामुळे जे मुद्दे ते मांडत आहेत, त्याचा लोकांवर परिणाम होणार नाही. असेच मुद्दे ते उचलत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. बाजूचे राज्य पाकिस्तान नाही महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आपण आग्रह करू शकतो. मात्र दुराग्रह करू शकत नाही. मी उद्या तामिळनाडूमध्ये गेलो तर मला कोणी तामिळनाडूची भाषा शिकवण्याचा दुराग्रह करू शकत नाही. मी जर वाटले की मी मराठीत बोलायचे तर मराठी बोलेल. मात्र कोणी दुराग्रह करेल ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो. बाजूचे राज्य काही पाकिस्तान नाही. एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवूच शकत नाही, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. मराठी मुलांच्या हिताचाच निर्णय घेणार मराठी मुलांच्या हिताचा जो निर्णय असेल, तोच निर्णय राज्य सरकार घेणार आहे. आम्ही स्थापन केलेली समिती योग्य अहवाल देईल. मराठी मुलांच्या हिताचा जो निर्णय असेल तोच समितीच्या अहवालातून समोर येईल आणि तोच निर्णय आम्ही घेऊ. कोणाच्याही दबावाला सरकार बळी पडणार नाही, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गुंडशाही करणाऱ्यांवर कारवाई भाषेवरून मारहाण करणे हे अतिशय चुकीचे आहे. आम्ही मराठी आहोत, मराठीचा अभिमान आम्हाला देखील आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली गेली पाहिजे. मात्र एखाद्या व्यावसायिकाला मराठी भाषा आलीच पाहिजे असा आग्रह धरणे चुकीचे आहे. महाराष्ट्रातील देखील अनेक मराठी लोक वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्यवसाय करतात. त्यांना देखील तिथली भाषा येत नसेल. त्यांच्यासोबत देखील अशीच वागणूक मिळेल का? महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गुंडशाही योग्य नाही. अशी गुंडशाही करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.