अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी थेट गुजरातची घोषणा दिली. त्यामुळे आता मोठे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांच्या प्रतिक्रिया देखील येत असून जोरदार टीका केली जात आहे. आता मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी देखील खऊट प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर दौऱ्यावर जात असताना त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हणणे हे चांगले नाही. माझी प्रतिक्रिया खूप खऊट असते. पण मी ते ऐकले नाही, त्यामुळे त्याच्यावर आत्ताच बोलणार नाही, असे जरांगे म्हणाले. तसेच तुम्हाला हिंदी सक्ती करायची तर देशात मराठी सक्ती करा, ते होणार आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?- संजय राऊत दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शहा सेना असा उल्लेख करत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले. पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर ‘जय गुजरात’ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा हजार माराव्या आणि एक मोजाव्या. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल देखील संजय राऊत यांनी विचारला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशाच एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी देखील सहभाग घेतला. या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाषणादरम्यान एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असा नारा दिला. त्यामुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.