मराठी बोलणार नाही, काय करायचे ते करून घ्या, असे वक्तव्य करत महाराष्ट्रामध्ये वादाची ठिणगी टाकणारे मुंबईतील गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी अखेर माफी मागितली आहे. सुशील केडिया यांचे कार्यालय मनसैनिकांनी आज सकाळीच फोडले होते. त्यानंतर सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. या संदर्भात केडिया म्हणाले की, मला माफ करा, माझे वक्तव्य मी मागे घेतो. मात्र राज्यातील खराब झालेले वातावरण ज्यांना शक्य असेल त्यांनी नीट करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्यांनी मराठी जनतेची आणि राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडले मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुप्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांचे कार्यालय फोडले आहे. केडिया यांनी परवा एका पोस्टद्वारे मी मराठी बोलणार नाही असे ठणकावून सांगितले होते. तसेच तुम्हाला काय करायचे ते करा असे आव्हानही त्यांनी राज ठाकरे यांना दिले होते. त्यांच्या या विधानामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. काय म्हणाले होते सुशील केडिया? मागील 30 वर्षे मी मुंबईत राहिलो. त्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात, ते पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करावे लागेल बोल? असे सुशील केडिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. केडिया यांनी आपले हे ट्विट थेट राज ठाकरे यांनाही टॅग केले होते. त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता.