राज्यात मराठीच्या मुद्द्यावर वातावरण तापले असतानाच, भोजपुरी अभिनेता आणि भाजप खासदार दिनेश लाल यादव उर्फ ‘निरहुआ’ याने एक विधान करून नव्या वादाला तोंड फोडले. “मी मराठी बोलत नाही, दम असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून दाखवा,” अशी मुक्ताफळे त्याने उधळली. यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला चांगलेच फटकारले. तू महाराष्ट्रात येऊन उभा रहा म्हणजे कळेल तुला तुझी भोजपुरी कुठे आहे? असे जोरदार प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी निरहुआ याला दिले. शिवाय त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तब्बल 18 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आले. त्यांनी मराठीचा हुंकार भरत, मुंबईत मराठीत बोलण्याचा आग्रह पुन्हा ठामपणे मांडला. मुंबईत मराठीत बोलण्याचा आग्रह दोन्ही बंधूंनी धरला. मुंबईत येऊन मराठी लोकांवर जो दादागिरी करेल, त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याचा इशारा दिला. कालच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळव्याला काँग्रेस नेते अनुपस्थित होते. पण आज काँग्रेस राज ठाकरेंच्या मदतीला धावली. नेमके काय म्हणाले विजय वडेट्टीवार? दिनेश लाल यादव निरहुआ भोजपुरी कलाकार असला तरी महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या भरोशावर मोठा झाला आहे, एखाद्या भाषेचा असा अपमान करणे म्हणजे त्या खासदाराच्या बुध्दीची दिवाळखोरी आहे, तू महाराष्ट्रात येऊन उभा रहा म्हणजे कळेल तुला तुझी भोजपुरी कुठे आहे? असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. यावेळी त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केला. दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांना पहलगाम आठवायला लागले आहे, तुम्ही पाकिस्तानात जाऊन शंभर अतिरेकी मारल्याचे छाती ठोकून सांगत आहेत. मात्र पहलगामचे चार आतंकवादी अजून सापडलेले नाही, पुलवामामध्ये अडीचशे किलो आरडीएक्स आले, तुम्ही लोकांना वारंवार मूर्ख बनवू शकत नाही, त्यामुळे यांची भीती साहजिक आहे, दोन भाऊ एकत्र आल्यामुळे शेलार यांची पंचायत झाली आहे, म्हणून ते असे वक्तव्य करत आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. काय आहे निरहुआचे विधान? मीरा रोड परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी एका फास्ट फूड विक्रेत्याला मराठीत बोलण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडल्यानंतर, निरहुआने प्रतिक्रिया दिली. “मी मराठी बोलत नाही. मी भोजपुरी बोलतो. जर तुमच्यात दम असेल, तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा,” असे खुले आव्हानच त्याने दिले होते. . त्याच्या या वक्तव्यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याचे कान टोचले आहेत. सुशील केडियाची माघार दरम्यान, मराठी भाषेबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता सुशील केडियाने माघार घेतली आहे. त्यानी एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले, मी केलेले ते ट्विट चुकीच्या मानसिक अवस्थेत व तणावात लिहिले गेले होते. पण माझ्या त्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. काही लोकांना वाद निर्माण करत त्यामधून फायदा मिळवण्याचा होता. पण मराठी न कळणाऱ्या काही जणांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावाखाली होतो. पण मला आता जाणवत आहे की मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी. हे ही वाचा… मराठीसाठी एकत्र येत आहेत, तर वेगळे का झाले होते?:राज ठाकरे बडव्यांच्या कडेवर जाऊन बसले, मंत्री प्रताप सारनाईकांचे एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा काल (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये पार पडला. तब्बल 19 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले, आणि त्यांच्या भेटीने संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून प्रतिक्रिया दिली आहे. पूर्ण बातमी वाचा…