राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या व त्यांना शिवराळ भाषेत बोलणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी ही नोटीस बजावली असून, हाके यांनी सात दिवसांत अजित पवार यांची लेखी माफी मागावी, अन्यथा न्यायालयात खेचण्याचा इशारा नितीन यादव यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात वेळोवेळी जाणुनबुजुन बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधात कायदेतज्ज्ञ ॲड. शंतनु माळशिकारे यांच्या वतीने नितीन संजय यादव यांनी लक्ष्मण हाके यांना आज नोटीस बजावली. लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांची लेखी माफी न मागितल्यास लक्ष्मण हाके यांना न्यायालयात खेचून दिवाणी, फौजदारी व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नितीन यादव यांनी म्हटले आहे. नोटीसमध्ये नेमके काय म्हटले? लक्ष्मण हाके यांनी 19 जून 2025 रोजी पुण्यामध्ये जाहीरपणे आरोप केला होता की, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी महाज्योती योजनेला “दुय्यम वागणूक” दिली आहे. त्यानंतर 3 जुलै 2025 रोजी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे महाज्योती योजनेतील निधीच्या कथित कमतरतेवर लक्ष वेधण्यासाठी निदर्शनादरम्यान, हाके यांनी अजित पवार यांच्यासाठी “हरामखोर” या अपमानास्पद शब्दाचा वापर केला. इतकंच नाही, तर मालेगाव कारखाना निवडणुकीत पवारांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचाही आरोप करत, ओबीसी समुदाय त्यांच्यापासून दुरावल्याचे म्हटले होते. मानहानीचा दावा आणि भारतीय न्याय संहिता नितीन संजय यादव यांचा दावा आहे की, ही विधाने अजित पवार यांची प्रतिष्ठा मलिन करण्याच्या उद्देशाने केली गेली असून, ती भारतीय न्याय संहिता, 2023 (BNS) च्या कलम 356(1) अंतर्गत मानहानीच्या कक्षेत येतात. या कलमानुसार, एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने किंवा हानी पोहोचेल हे माहीत असूनही असे विधान करणे हा मानहानीचा गुन्हा आहे. हाकेंनी बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी 19 जून 2025 (पुणे) आणि 3 जुलै 2025 (मुंबई) रोजी केलेल्या बदनामीकारक विधानांसाठी अजित पवार यांची बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी. ही माफी किमान तीन मोठ्या वृत्तपत्रांमध्ये (इंग्रजी, मराठी आणि हिंदी) प्रकाशित करावी आणि त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पोस्ट करावी, जिथे ही विधाने प्रसारित केली गेली होती. हे सर्व नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत पूर्ण करावे. अजित पवार यांच्या विरोधात भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने, तोंडी किंवा लेखी, थेट किंवा अप्रत्यक्षपणे करणे थांबवावे. अजित पवार यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचा किंवा त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करणारी कोणतीही कृती भविष्यात करू नये. या मागण्यांचे पालन न केल्यास, नितीन संजय यादव यांनी फौजदारी तक्रार (BNS च्या कलम ३५६(२) अंतर्गत), नुकसानीसाठी दिवाणी खटला आणि पुढील बदनामीकारक सामग्री प्रकाशित करण्यापासून रोखण्यासाठी मनाई हुकूम दाखल करण्याचा इशारा दिला आहे. सर्व कायदेशीर कार्यवाहीचा खर्चही हाके यांच्याकडून वसूल केला जाईल असे नोटीसमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.