एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या अटकेप्रकरणी, ॲड. असीम सरोदे यांनी गंभीर आरोप करत पोलिसांवर खासगी जीवनाच्या अधिकाराचा भंग केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी खासगी पार्टीला रेव्ह पार्टीचा आभास निर्माण केला आणि कोकेनचा बनावट पुरावा लावून त्या व्यक्तींना समाजासमोर आरोपी असल्याचे भासवले. हे प्रकरण लवकरच उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता असून, त्यामुळे पुणे पोलिसांची अडचण वाढू शकते, असा इशाराही ॲड. सरोदे यांनी दिला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर आणि अन्य सात जणांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणात अटक केली. मात्र या कारवाई मागे राजकीय हेतू असल्याचा गंभीर आरोप ॲड. असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात पुणे पोलिसांनी राजकीय उद्देश ठेऊन दृश्यम चित्रपटाप्रमाणे खोटं चित्र रंगवल्याचा दावा असीम सरोदे यांनी केला. घरामध्ये दारू पिणे हा गुन्हा नाही, पण पोलिसांनी याला रेव्ह पार्टीचे स्वरुप दिल्याचे सरोदे म्हणाले. घरामध्ये दारू पिणे हा काही गुन्हा नाही असीम सरोदे म्हणाले की, विश्वास नांगरे पाटील हे पुण्याचे पोलिस अधीक्षक असताना त्यांनी एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली होती. रेव्ह पार्टीमध्ये मोठ्या आवाजातील संगीत असते, लोकांची मोठी संख्या असते. तसेच त्या ठिकाणचे लोक हे अत्यंत तोडक्या कपड्यांमध्ये असतात. या पार्टीत अफू, गांजा आणि इतर नशिल्या पदार्थांचा समावेश असतो. याला रेव्ह पार्टी म्हणतात. आता पुणे पोलिसांनी जी कारवाई केली ती केस वेगळी आहे. ज्या सात लोकांना पकडण्यात आले आहे ते एका घरामध्ये दारू, बीयर पित होते. घरामध्ये दारू पिणे हा काही गुन्हा नाही. पण पोलिसांनी या प्रकरणाला राजकीय उद्देशाने रेव्ह पार्टीचे स्वरुप दिले आहे. तसेच पोलिसांचा राजकीय वापर सुरू आहे असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पोलिसांनी एक चित्र तयार केले पुढे असीम सरोदे म्हणाले, प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. प्लांटेड पुराव्यांच्या आधारे डॉ. खेवलकर आणि इतरांना गुन्हेगार ठरवण्याचे कट कारस्थान हे पोलिसांनीच रचले आहे. पोलिसांनी दोन ग्रॅम कोकेन सापडल्याचा दावा केला आहे. परंतु त्यांनी सात मिलिग्रॅम कोकेन जास्त भरले पाहिजे अशी व्यवस्था करून या लोकांना बेल मिळणार नाही अशी व्यवस्था केली. पोलिसांनी एक चित्र तयार केले. राजकीय निर्देशाखाली ते वागले. न्यायालयात येण्यापूर्वीच तो व्हिडीओ व्हायरल केला व्हिडीओ व्हायरल करणे म्हणजे व्यक्तीचे खासगी जीवन जगण्याच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे. ही चूक पोलिसांना भोवणार आहे. पोलिसांचा वापर हा राजकीय स्वार्थातून केला जात आहे. हे राजकीय पोलिसिंग थांबले पाहिजे. या केसचे इतर धागेदोरे समोर येत आहेत. उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी हा व्हिडीओ काढणे आणि व्हायरल करणे, न्यायालयात येण्यापूर्वीच तो व्हिडीओ व्हायरल करणे, एकनाथ खडसे यांची बदनामी करण्यासाठी हे सर्व केल्याचं दिसतंय. पोलिसांनी स्वतःच्या अंगझडतीचा कोणताही पंचनामा न करता त्या ठिकाणी धाड टाकली आणि कोकेन पुरावा प्लँटेड केला.