देशामध्ये इंडिया आघाडी सक्षमतेने काम करत असून इंडिया आघाडीमध्ये चांगला समन्वय असल्याचे संसदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून देखील दिसून येत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी बाबत देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ठाकरे बंधुंच्या युती-वर दोन भाऊ एकत्र येत असेल तर त्यावर काँग्रेसला कोणताही आक्षेप घेण्याचे कारण नसल्याचेही ते म्हणाले. काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत 33 टक्के ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत तर 66 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. 41 टक्के ओबीसी, 19 टक्के एससी, एसटी तर 33 महिलांना संधी देण्यात आली असल्याचेही सपकाळ यांनी सांगितले. कार्यकारिणीत भौगोलिक व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. विधानसभेत मंत्री पत्ते खेळत आहेत तर बाहेर WWF वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, विधानसभेत मंत्री चक्क पत्ते खेळत आहेत तर बाहेर WWF सुरु आहे. गृह राज्य मंत्र्यांचे कुटुंब डान्सबार चालवते पण सरकारला त्याचे काही गांभीर्य नाही. या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत यासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने सभागृहात व रस्त्यावरही आंदोलन करून आवाज उठवला आहे. पण गेंड्याच्या कातडी पेक्षाही सरकारची कातडी जाड आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा नैतिकतेच्या आधारे घेतला नाही तर विरोधी पक्षांचा व समाजाचा दबाव वाढल्याने घ्यावा लागला आहे. इतर कलंकित मंत्र्यांचेही राजीनामे घ्यावेत ही काँग्रेसची मागणी आहे. प्रणिती शिंदे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला खासदार प्रणिती शिंदे यांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, त्यांनी ऑपरेशन सिंदूर वा सैनिकांचा अपमान केलेला नाही, त्यांच्या विधानाचा चुकीच्या पद्धतीने अर्थ लावला आहे. सैनिकांच्या पराक्रमाचा आम्हाला अभिमानच आहे पण त्याचे श्रेय लाटण्यासाठी भाजपने मोदींचे लष्करी गणवेशातील होर्डींग देशभर लावले. भाजपा नेत्यांने एका महिला अधिकाऱ्यांवर अत्यंत खालच्या पातळीवर वक्तव्य केले यासंदर्भात प्रणिती शिंदे यांचे विधान होते असे सपकाळ म्हणाले.. भाजप सरकारने शिमला करार रद्द केला का? – पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूर संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट उत्तर दिलेले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम केल्याचे ३० वेळा सांगितले त्यावर मोदी गप्प आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान ते खोडून का काढत नाहीत. मोदी खोटे बोलत आहेत, का ट्रम्प हे स्पष्ट झाले पाहिजे. तसेच केंद्रातील भाजप सरकारने शिमला करार रद्द केला आहे का आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत केलेल्या विधानावर मोदी सरकारने खुलासा केला पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अतिरेकी कसाब संदर्भात उज्ज्वल निकम यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कसाबला कायद्याने, न्यायालयीन प्रक्रियेनुसार फाशीची शिक्षा दिलेली आहे. ही फाशीची शिक्षा काँग्रेस सरकार असताना दिलेली आहे. त्यामुळे उज्ज्वल निकम यांच्या वक्तव्यात काहीही अर्थ नाही, भाजपने त्यांना राज्यसभा सदस्यत्व दिले आहे त्यामुळे ते काहीतरी बोलत आहेत असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.