राज्यातील काही भागांत मागील दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर ओसरताना दिसत असला तरी, काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्याप विश्रांती घेतलेली नाही. विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केला आहे. राज्यातील इतर ठिकाणी पावसाच्या सरी मध्यम स्वरूपात कोसळतील. बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे आणि पंढरपूर परिसरातील धरणक्षेत्रांमध्ये पावसामुळे जलसाठा वाढल्याने धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विदर्भात येलो अलर्ट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. गडचिरोलीच्या काही भागांचा संपर्क मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे तुटल्याची नोंद आहे, त्यामुळे याठिकाणी प्रशासन अधिक सतर्क आहे. पुणे आणि पंढरपूर परिसरात धरणांमधून पाण्याचा विसर्ग खडकवासला धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाजवळील भागांना याबाबत आधीच खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याचबरोबर पंढरपूरकडेही दमदार पावसामुळे संबंधित धरण लवकरच भरू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. मुंबई आणि कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस मुंबईत सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, हा पाऊस जोरदार नसून मध्यम स्वरूपाचा आहे. कोकण, नाशिक, कोल्हापूर, सातारा आणि रायगड या भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही भागांत हवामान ढगाळ असून हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अजूनही जोरदार पावसाची वाट राज्याच्या काही भागांमध्ये यंदा मान्सून लवकर दाखल झाला असला तरी, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी अजूनही आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. यावर्षी पावसाचा सुरुवातीचा जोर चांगला असला, तरी आता पावसाचा वेग अधूनमधून कमी-जास्त होताना दिसतोय. 1979 नंतर पहिल्यांदाच जुलैमध्ये जायकवाडीतून पाणी सुटणार दरम्यान, जायकवाडी धरणातून गुरुवारी (31 जुलै) पाणी सोडण्यात येणार आहे. धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात येणार आहेत. यामधून दहा हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता जायकवाडीच्या पाण्याचे पूजन केले जाणार आहे. धरणातून 9432 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. 1979 नंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात जायकवाडीचे पाणी सोडण्यात येत आहे.