महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पार्श्वभूमी आणि विविध राजकीय घडामोडी लक्षात घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अचानक दिल्ली दौरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून परतल्यानंतर लगेचच शिंदे यांनी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. या दौऱ्यामागे सुरू असलेल्या विविध चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांच्या गटातील काही मंत्री आणि आमदार सध्या वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकलेले आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भेटीत पक्षाच्या प्रतिमेच्या संदर्भात भाजपकडून काही स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्षा वरच्या खटल्याची येणारी सुनावणी, मंत्र्यांवरील प्रकरणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी या मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे समजते. दिल्लीमध्ये सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या अनुषंगाने एकनाथ शिंदे हे पक्षाच्या खासदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत अधिवेशनात मांडायच्या मुद्द्यांबाबतही चर्चा होणार असून, पक्षाच्या आगामी रणनीतीबाबतही दिशा दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे इतर राज्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी देखील ते संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे शिंदे गटात हालचाली वाढल्या असून, सर्वोच्च न्यायालयात अपेक्षित असलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आगामी राजकीय स्थितीबाबत तयारी सुरू असल्याचे मानले जात आहे. राज्यात अनेक मंत्री वादग्रस्त ठरत असताना आणि सरकारवर विरोधकांकडून टीका होत असताना, भाजप व शिंदे गट यांच्यातील संवाद महत्त्वाचा मानला जात आहे. उबाठाकडून सरकारवर टीकास्त्र कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट आणि योगेश कदम यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सामना संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या मंत्र्यांवर कारवाई न करता केवळ समज देण्याचे धोरण सरकारने स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्यात लवकरच महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीचे घटक पक्ष निवडणुकीत एकत्र येणार की नाही, याबाबतही स्पष्टता नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि त्यावेळी झालेल्या बैठका राज्याच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार आहेत. खासदारांच्या बैठकीसाठी दौरा एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे प्रत्येक अधिवेशनाला आपल्या खासदारांना भेटायला आणि त्यांची बैठक घेण्यासाठी दिल्लीला जात असतात. तसेच ते काही राज्य प्रमुखांच्या भेटी सुद्धा घेणार आहेत असे सामंत म्हणाले.