भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल, अशा शब्दात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना न्यायालयातच रडू कोसळले होते. मी संन्यासी आयुष्य जगले तरी देखील माझी बदनामी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माझ्या वरुन भगव्या रंगाची बदनामी करण्यात आली. मात्र आज त्याच भगव्या रंगाचा विजय झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एनआयए कोर्टात न्यायाधीशांना उद्देशून साध्वी प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, मी सुरुवातीपासूनच हे सांगितले होते की ज्यांना चौकशीसाठी बोलावले जाते त्यांच्यामागे एक आधार असावा लागतो. त्यांनी मला चौकशीसाठी बोलावले आणि अटक केली. त्यानंतर माझा छळ करण्यात आला. त्यामुळे माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. मी एका संन्यासी सारखे जीवन जगत होतो. पण मला आरोपी बनवण्यात आले आणि कोणीही स्वेच्छेने आमच्या बाजूला उभे राहिले नाही. मी जिवंत आहे कारण मी संन्यासी आहे. त्यांनी कट रचून भगव्याची बदनामी केली. आज भगव्याचा विजय झाला आहे. हिंदुत्वाचा विजय झाला आहे. यात जे दोषी आहेत त्यांना देव शिक्षा करेल. एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. ज्यात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासह इतरांचा समावेश आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी नाशिकमधील मालेगाव शहरातील एका मशिदी जवळ मोटारसायकलला बांधलेल्या स्फोटक यंत्राचा स्फोट झाला ज्यामध्ये सहा जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले होते. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिंदू दहशतवादी असल्याचा आरोप मालेगाव बॉम्बस्फोटात 2008 मध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या. या आरोपात त्या 9 वर्षे तुरुंगात होत्या. सध्या त्या जामिनावर होत्या. मालेगाव बॉम्बस्फोटानंतर त्यांच्यावर हिंदू दहशतवादी असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणात एनआयएने त्यांना पुराव्याअभावी आधीच क्लीनचीट दिली होती. 2007 च्या सुरुवातीला साध्वी सिंह यांना आरएसएस प्रचारक सुनील जोशी हत्या प्रकरणातही आरोपी बनवण्यात आले होते. परंतु, देवास न्यायालयाने त्यांना सर्व आरोपांतून मुक्त केले होते. जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर साध्वी म्हणाल्या होत्या की, त्यांना 23 दिवस तुरुंगात सतत छळण्यात आले. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग केला आणि ते बरोबर सिद्ध करण्यासाठी मला खोट्या प्रकरणात अडकवले, असा आरोप साध्वी प्रज्ञा यांनी केला होता. आता या सर्व प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.