महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे व कुटुंबीयांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समोर आली आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीनंतर आमदार सुरेश धस यांनी पत्रकारांशी संवाद साधत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आमदार सुरेश धस म्हणाले, अजित दादांनी जो निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. वस्तुस्थिती जी ते पाहण्यासाठी अजितदादांनी त्यांच्या विश्वासातील माणसं परळीमध्ये पाठवावीत. तिथे काय चालते, माणसं किड्या मुंग्यांसारखे मारले जातात. आज 21 महीने झाले महादेव मुंडे प्रकरणाला, तिथे जे लोकप्रतिनिधी राहतात त्यांना एकदाही जाता आले नाही का महादेव मुंडेंच्या घरी? आम्ही गेलो तर आम्हाला काळे झेंडे दाखवतात. तुमच्या घरापासून 500 मीटर अंतरावर महादेव मुंडे यांचे घर आहे, मग तुम्हाला का जाता आले नाही? असा सवाल धस यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत आम्हाला माहीत आहे कोण रोज बातम्या चालवत आहे. तिथे जाऊन कोण उपोषणाला बसले आहे, कोण त्यांच्या मुलाखती चालवत आहे ते सगळे आम्हाला माहीत आहे. हे डाव कोणाचे आहेत हे सगळे कळते. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की पोलिस खात्यात जे लोक चुकीचे आहेत, त्यांना वेचून बाहेर काढा. आता कुठे जाऊन परळीने निःश्वास सोडला आहे. सलग तीन दिवस तीन घटना तीन घटना सलग तीन दिवस घडल्या आहेत, पहिल्यांदा पुजारीला मारले, दुसरे संजय सातभाईला मारले आणि तिसरे महादेव मुंडेंना मारले. मुख्यमंत्री महिदायांनी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली या तीन लोकांची नावे आणि डीजी साहेबांना देखील फोन करून सांगितले आणि जे ज्ञानेश्वरी ताईंनी निवेदन दिले होते ते निवेदन घेऊन डीजींकडे पाठवले असून याची ऑर्डर काढण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांना परत मंत्रिमंडळात घेतले तर तुमची भूमिका काय असणार, असा प्रश्न सुरेश धस यांना विचारण्यात आला. यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, आम्ही आमच्या पातळीवर मुख्यमंत्र्यांना जे बोलायचे ते बोलू. त्यांचा पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना बोलण्याचा आम्हाला नैतिक अधिकार नाही. जे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात इतक्या निर्घृणपणे एका मागे एक बालाजी मुंडे, बापू आंधळे, महादेव मुंडे, संतोष देशमुख यात यांचेच सगळे सांभाळणारे माणसं आहेत. आणि हा माझाच माणूस म्हणणाऱ्यांना संधी द्यायची तर मुख्यमंत्र्यांना आम्ही बोलू. मुख्यमंत्र्यांनी फोटो बघून डोक्याला हात लावला सुरेश धस म्हणाले, मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी आम्ही महादेव मुंडे हत्या प्रकरणाचे फोटो दाखवले तेव्हा त्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला. इतके भयानक असू शकते का असा प्रश्न त्यांना पडला होता. यात पोलिस कर्मचारी सुद्धा काही सहभागी आहेत का याचा देखील तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. एसआयटी स्थापन केल्यानंतर महादेव मुंडे यांचे खूनी शंभर टक्के सापडतील, असा विश्वास धस यांनी व्यक्त केला आहे. फोटो पाहताच मुख्यमंत्र्यांनी डोळे झाकले- ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावर ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या, आरोपी शंभर टक्के पकडले जाणार असा विश्वास आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी दिला आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. मुख्यमंत्र्यांचा शब्द म्हणजे संविधानाचा शब्द आपण मानतो. जेव्हा मी त्यांना 21 महिन्यांचा वृतांत त्यांना सांगितला तेव्हा ते देखील भावुक झाले. फोटो पाहताच त्यांनी डोळे झाकले आणि माझ्या मुला-बाळांकडे बघून त्यांनी तातडीने पोलिसांना आदेश दिले आहेत की यात पूर्ण लक्ष घालून कारवाई करा.