आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास आज संपला. या दरम्यान खामगाव शहरातून मोठ्या संख्येने भाविक शेगावपर्यंत सहभागी झाले होते. खामगाव ते शेगाव या मार्गात ‘गण गण गणात बोते’चा गजर करत भक्तांचा शब्दश: सागर उसळला होता. भक्ती रसाचे अद्भुत दृष्य पाहण्यासाठी भाविकांनी देखील मोठी गर्दी केली होती. श्रींच्या पालखीचे गुरुवारी पहाटे 5 वाजता खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी श्रींचा पालखी सोहळ्याचे हे 56 वे वर्ष असून 2 जून रोजी प्रस्थान केलेल्या पालखीचा 30 जुलै खामगाव येथील शेवटचा मुक्काम होता. गुरुवार 31 जुलै रोजी पहाटे 5 वाजता श्रींची पालखी अग्रसेन चौक, कमान गेट, शहर पोलिस स्टेशन, आयकर भवन, बस स्टॅन्ड, सामान्य रुग्णालय समोरून शेगावकडे प्रस्थान केले. शेगाव येथे सायंकाळी या पालखी सोहळ्याचे विसर्जन झाले. खामगाव ते शेगाव या पायी वारीत हजारो भाविक सहभागी झाले होते. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे बुधवारी खामगाव शहरात भाविकांच्या वतीने हर्षोल्हसात स्वागत झाले. 2 जून रोजी प्रस्थान झालेल्या या पालखी सोहळ्यात 700 वारकरी सहभागी झाले होते. 33 दिवसांची ही पायी वारी करून सुमारे 750 किलोमीटरचा प्रवास करत वारकरी परतले आहेत. श्रींच्या दर्शनासाठी शहरात भाविकांची गर्दी दिवसभर होती 31 जुलै रोजी पहाटे 5 वाजता श्रींच्या पालखीचे शेगावकडे प्रस्थान झाले होते.