साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी बाधित होणाऱ्या नागरिकांना त्याच परिसरामध्ये सदनिका देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष देण्याचे मागणी देखील त्यांनी केली आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. या प्रकल्पामध्ये साधारण 200 ते 220 कुटुंबे बाधित होत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या परिसरातील घरांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण प्राधान्याने हाती घेण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. एकही कुटुंब सुटू नये, असे या विस्थापित होणाऱ्या कुटुंबाचे म्हणणे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी केलेली पोस्ट देखील पहा… मुंबईतील चिरानगर येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक होणार आहे. परंतु हे स्मारक उभा राहत असताना साधारणतः २०० ते २२० कुटुंबे बाधित होत आहेत. त्यांना स्मारकाच्या परिसरातच सदनिका देण्यात याव्या अशी विस्थापित होणाऱ्यांची मागणी आहे. तसेच परिसरातील काही घरांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण झालेले नाही. ते प्राधान्याने हाती घ्यावे. यातून एकही कुटुंब सुटू नये असेही विस्थापित होणाऱ्या कुटुंबांचे म्हणणे आहे. चिरानगरच्या घरात अण्णा भाऊ साठे यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘चिरानगरची भुतं’ हा त्यांचा अतिशय प्रसिद्ध आणि कसदार असा कथासंग्रह आहे. येथील श्रमिकांच्या, कष्टकऱ्यांच्या आयुष्याचा फार मोठा प्रभाव त्यांच्या लिखाणावर आणि एकंदर आयुष्यावर पडला होता. या अर्थाने चिरानगरची ही मंडळी त्यांच्या विस्तृत कुटुंबाचा एक भाग होती असंही म्हणता येईल. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास ही चिरानगरच्या रहिवाशांचा विरोध नाही. परंतु यासाठीची पुनर्वसन प्रक्रिया योग्य पद्धतीने आणि लोकांना विश्वासात घेऊन करणे गरजेचे आहे. अण्णा भाऊंनी नेहमीच श्रमिक आणि विस्थापितांचा आवाज बुलंद केला. त्यांच्या स्मारकामुळे विस्थापितांवर अन्याय होत असेल तर तो त्यांच्या स्मृतींचा अवमान असेल. म्हणूनच माझी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की कृपया आपण चिरानगरच्या रहिवाशांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी. शासनाने या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करावे.