मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर माजी भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपले अनुभव माध्यमांसमोर कथन केले. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुदर्शन, इंद्रेश, रामजी माधव यांच्यासारख्या लोकांची नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात होता, असा खळबळजनक दावा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. तसेच तुरुंगात माझा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला, असा आरोपही त्यांनी केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह इतर सात आरोपींची निर्दोष मुक्त केले. सरकारी वकिल आरोपीविरुद्धचा खटला सिद्ध करू शकले नाहीत, असे कोर्टाने म्हटले होते. सुमारे 17 हा खटला चालला होता. आज माध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उपरोक्त दावा केला आहे. नेमक्या काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा सिंह? माझ्यावर इतके अत्याचार झाले की ते शब्दांत मांडता येणार नाहीत. एटीएस अधिकाऱ्यांनी 13 दिवस बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले. या काळात मला ज्या यातना आणि अत्याचार सहन करावे लागले, त्यासाठी शब्द अपुरे आहेत. शब्दांनाही मर्यादा असते, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे. मोदी, भागवत यांच्यासह अनेकांची नावे घेण्यासाठी दबाव साध्वी प्रज्ञा पुढे म्हणाल्या, मला नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुदर्शन, इंद्रेश, राम माधव यांची नावे घेण्यास भाग पाडले जात होते. ‘तुम्ही या लोकांची नावे घेतल्यास आम्ही तुम्हाला मारणार नाही’ असे अधिकारी वारंवार म्हणत होते. त्यांचा मुख्य उद्देश मला त्रास देणे हाच होता. मला सर्व काही खोटे बोलण्यास सांगितले जात होते, म्हणून मी कोणाचेही नाव घेतले नाही. तुरुंगात मानसिक आणि शारीरिक त्रास दिला गेला या लोकांनी छळ करून माझ्याकडून खूप काही वदवून घेण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही खोटे बोलणार नाही. देशाला घाबरण्याची गरज नाही. देशभक्त आपल्या देशासाठी जगतात आणि मरतात. अनेक एटीएस अधिकाऱ्यांनी कायद्याच्या नावाखाली बेकायदेशीर कामे केल्याचा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी केला. तुरुंगात मला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला, असेही त्या म्हणाल्या. भगवा आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न न्यायालयाच्या निर्णयावर प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, हा भगव्याचा, धर्माचा आणि सनातन धर्माचा विजय आहे. पण यांना पराभूत करण्याची या लोकांमध्ये हिंमत नाही. या लोकांनी छळ करून भगवा आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा कुत्सित प्रयत्न केला. अशा लोकांना शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. हा संपूर्ण खटला बनावट होता, त्याला कोणताही आधार नव्हता. सत्य नेहमीच समोर येते आणि सिद्ध होते, या प्रकरणातही तेच झाले. हे ही वाचा… मालेगाव ब्लास्ट – ATS च्या माजी PI चा गौप्यस्फोट:सरसंघचालकांना अटक करण्याचे होते आदेश; भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा होता दबाव मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश होते, असा गौप्यस्फोट या प्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र एटीएसच्या एका माजी इन्स्पेक्टरने केला आहे. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. सविस्तर वाचा…