राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. अकोल्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?” असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच संजय शिरसाट यांच्या एका व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला होता, ज्यामध्ये ते एका खोलीत अर्धनग्न अवस्थेत बसले होते आणि त्यांच्या बाजुला पैशांची बॅग दिसत होती. तसेच राज्यात मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकार अडचणीत सापडत असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना संयमित आणि जबाबदारीने बोलण्याची ताकीद दिली होती. तसेच खाते बदलासारखे निर्णयही घेतले गेले. मात्र तरीही मंत्र्यांच्या वागणुकीत फारसा फरक पडताना दिसत नाही. नेमके काय म्हणाले संजय शिरसाट? अकोला शहरातील निमवाडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या नूतन वास्तूचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी ‘आपल्या भागातील वसतिगृहासाठी निधीची मागणी करा. वसतिगृहाला पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी लागत असेल तरी तो मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातायं?.’ असे विधान बेधडकपणे केले. राज्यात 120 वसतिगृहे उभारली जाणार मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथम राज्यातील वसतिगृहाची पाहणी केली होती. खेड्यापाड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुविधा अधिक व चांगल्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात 120 वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी एक हजार 200 कोटी रुपयांच्या निधीची तरतुदही करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. संजय शिरसाट यांच्या अडचणी संपता संपेना… मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी संपता संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील काही दिवसांपासून संजय शिरसाट हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आले आहेत. नुकतीच त्यांनी आपल्या खात्याला निधी मिळत नसल्याचे सांगत अजित पवार यांच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. शिवाय राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजावर सध्या भाजपच्या आमदारांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखालील या विभागाची कार्यशैली आणि निर्णय प्रक्रियेतील विलंब यावर भाजपच्या काही आमदारांनी थेट राज्य नेतृत्वाकडे नाराजी नोंदवली आहे.