मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आता दत्तात्रय भरणे यांची कृषिमंत्री पदावर वर्णी लागली आहे. मात्र, भरणे कृषिमंत्री होताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. आता भरणे यांच्या समर्थकांनी ऑन कॅमेरा धमकी दिली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या संदर्भात खासदार सुप्रसिद्ध यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून दत्तात्रय भरणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भरणे यांचे समर्थक हनुमंतराव कोकाटे यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे त्यांनी ही धमकी ऑन कॅमेरा दिली असून असे धाडस करणाऱ्या कोकाटेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय अशा पद्धतीने धमकी देण्याची कोणताही जबाबदार राजकीय नेता हिंमत करू शकणार नसल्याचे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुळे यांनी केलेली पोस्ट देखील पहा… या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी महारुद्र पाटील यांनी पोलिसांना दिलेले पत्र देखील पोस्ट केले आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, ‘राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे समर्थक हणुमंतराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय या पद्धतीने सराईतासारखी जाहिर धमकी देण्याचे धाडस कोणताही जबाबदार राजकीय नेता करु शकणार नाही. महारुद्र पाटील हे एक जबाबदार पदाधिकारी असून गेली अनेक वर्षे ते राजकारण तथा समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांना ‘ऑन कॅमेरा’ धमकी देण्याचे धाडस करणाऱ्या कोकाटेंवर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. माझी पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण यांना विनंती आहे की कृपया आपण या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा.’ या आधीही कृषि-मंत्र्यांनाच निशाणा या आधी कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. वाल्मिक कराड प्रकरणात अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावरही अनेक आरोप करण्यात आले. अखेर विधिमंडळात रम्मी खेळण्याच्या प्रकरणानंतर त्यांच्याकडील खाते बदलण्यात आले आहे. आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषिमंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांकडे सर्वांचेच लक्ष आहे.