मराठी आणि हिंदी भाषिक वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत संतुलित आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. मराठी माणूस संकुचित नाही, तो संस्कारी आहे, अभिमानी आहे; मात्र हिंसक नाही, असे सांगत त्यांनी राज्यात सुरू असलेल्या भाषिक वादावर भाष्य केले. जो कोणी मुंबईत येईल, त्याचे स्वागत आमचा महाराष्ट्र करेल. तसेच भाषेच्या किंवा धर्माच्या आधारे कुणालाही लक्ष्य करणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी निशिकांत दुबे पटक पटक के मारेंगे आणि राज ठाकरे डुबा डुबा के मारेंगे या दोघांशीही आमचा संबंध नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. जो कुणी मुंबईत येईल त्याचे आम्ही स्वागत करू. कुणाशीही गैरवर्तवणूक होऊ देणार नाही. जो भारताचा कायदा सांगतो, ते आम्ही करू. कुणालाही भाषेच्या आधारे मारहाण योग्य नाही. महाराष्ट्रात मराठी यावी हा आग्रह योग्य परंतु मारहाण करणे हा दुराग्रह नको. मराठी बोलत नाही म्हणून मारहाण करू शकत नाही, असेही ते म्हणाले. नीतेश राणे योग्यच बोलले, पण… नीतेश राणेंच्या विधानाबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, राणे जे बोलले त्याचे समर्थन नाही. केवळ हिंदूंना मारले जाते, इतर धर्मीयांना नाही. नितेश राणे बोलले ते एकप्रकारे योग्य आहे, परंतु ते बोलणे चुकीचे आहे. केवळ भाषेच्या आधारे, धर्माच्या आधारे विभाजन करू शकत नाही. हे चुकीचे आहे. मराठी बोलत नसल्यामुळे मारहाण करणे चुकीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले, मुंबईत 2-3 घटना निश्चित घडल्या असतील, त्यावर आमच्या सरकारने कारवाई केली आहे. महाराष्ट्रात मराठी शिकणे बंधनकारक आहे. त्यावर तडजोड नाही. महाराष्ट्रात मराठी बोलली जावी असा आग्रह करणे हेदेखील चुकीचे नाही. परंतु कुणी मराठी बोलत नाही म्हणून त्याला मारहाण करणे आमच्या सरकारला मान्य नाही. असे करणाऱ्यांवर आम्ही कारवाई करणार म्हणजे करणारच. मराठी माणूस इतका संकुचित असू शकत नाही निशिकांत दुबेंच्या विधानाबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांचे पूर्ण विधान मी ऐकले नाही. परंतु त्यांनी मराठी माणसांबाबत काही म्हटले असेल तर ते चुकीचे आहे, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, आपण इतके संकुचित का होतोय? मराठी माणसांची संस्कृती, आपला इतिहास काय आहे, मराठ्यांनी केवळ महाराष्ट्र आणि मराठीसाठी लढाई केली नाही तर देशात हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे मराठे होते. मराठ्यांनी पानीपतची लढाई का लढली, अहमद शाह अब्दालीने पंजाब, बलुचिस्तान मला द्या, बाकीचा प्रांत तुम्ही ठेवा असं सांगितले. मराठ्यांना वाटलं असते तर त्यांनी अब्दालीसोबत समझौता केला असता परंतु एक इंचही जमीन आम्ही देणार नाही. तिथे पानीपतला जाऊन मराठे लढले, लाखो मृत पावले. 10 वर्षांनी पुन्हा मराठ्यांनी दिल्ली ताब्यात घेतली. तिथे भगवा झेंडा फडकावला. हा मराठ्यांचा इतिहास आहे. मराठी माणूस इतका संकुचित असू शकत नाही. हे जे चाललंय ते राजकारण आहे. कुणीही एकत्र आले तरीही महापालिका आम्हीच जिंकणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात काय हे त्यांनाच माहिती, मला त्यांच्या मनातले माहिती नाही. परंतु बऱ्याचदा राजकीय परिस्थिती अशी असते की लोकांना सोबत यावे लागते. आता दोघांचीही राजकीय परिस्थिती सारखी आहे म्हणून ते एकत्र आलेत. आता ते पुढे काय करतील माहिती नाही. मात्र माझा हा एपिसोड रेकॉर्ड ठेवा, महापालिका निवडणुका झाल्यावर दाखवा. कुणीही कुणासोबत गेले तरीही महापालिका निवडणूक आम्हीच जिंकणार, आमची महायुती महापालिका निवडणूक जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.