महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक मंत्री आपल्या कृती आणि विधानांमुळे विरोधकांच्या हातात मुद्दे देत आहेत. अलीकडेच आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ समोर आणला. त्यानंतर मंत्री मेघना बोर्डीकर यांचा ग्रामसेवकाला धमकी देतानाचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला. यामुळे रोहित पवार आणि मेघना बोर्डीकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी उफाळून आली आहे. अहिल्यानगर दौऱ्यावर असताना मंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी, हा व्हिडिओ रोहित पवारांना कुणी पाठवला, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे सांगून थेट सवाल उपस्थित केला. तसेच, रोहित पवारांना नेता बनण्याची घाई झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे. माझ्याजागी कुणीही असते तरी त्याच भावना असत्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना मेघना बोर्डीकर म्हणाल्या, संबंधित गावातील ग्रामसेवकाबद्दल महिलांच्या तक्रारी होत्या, माझ्याजागी कुणीही असते तरी त्याच भावना असत्या. मी घडलेल्या प्रकाराबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली. रोहित पवारांना तो व्हिडिओ कुणी पाठवला, याचीही माहितीही त्यांनी स्पष्टपणे दिली. सर्वच ग्रामसेवक तसे नाहीत, पण गावात एखाद्या नेत्याचा किती हस्तक्षेप असावा हे लोकांनी ठरवले पाहिजे. सरकारच्या योजना लोकांसाठी असतात. मात्र, खऱ्या गरजूंना योजना मिळत नसेल तर त्रागा होणारच. रोहित पवार अर्धवट माहिती पसरवतात, रोहित पवारांना नेता बनण्याची घाई झाली आहे. विजय भांबळेंवर मेघना बोर्डीकरांचा रोख आमच्या मतदारसंघातले रोहित पवारांचे जुने मित्र अजितदादांकडे आले आहेत, त्यांनीच हा कार्यक्रम केलाय, असे म्हणत बोर्डीकर यांनी संबंधित व्हिडिओ रोहित पवारांना कुणी पाठवला हे नाव न घेता सांगितले. त्यांनीच रोहित पवारांना अर्धवट माहिती पोहोचवली. रोहित पवारांना काही काम नसल्याने अर्धवट माहितीच्या आधारे दुसऱ्यांना दोष देत आहेत, असा टोला लगावला. तसेच मेघना बोर्डीकर यांचा रोख अजित पवार गटाचे नेते विजय भांबळे यांच्याकडे असून त्यांनीच रोहित पवारांना अर्धवट व्हिडिओ पाठवल्याचे म्हटले आहे. दरम्यान, ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी देत असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला होता. टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर कोणत्या अधिकारात देऊ शकतात असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला होता.