पुण्यातील कोथरूड पोलिसांवर तीन मुलींनी मारहाण, शिवीगाळ आणि जातीवाचक शब्द वापरण्याचा आरोप केला होता. मात्र, या आरोपांमध्ये कोणताही तथ्य नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी या सर्व आरोपांना फेटाळून लावत, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणात पोलिस कर्मचारी प्रेमा पाटील यांचा कुठलाही सहभाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात कोणताही विश्वासार्ह पुरावा समोर आलेला नसल्याने गुन्हा दाखल होऊ शकत नाही. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी संबंधित मुली करत असल्या तरी, ती कायदेशीर निकषांनुसार ग्राह्य धरली जाऊ शकत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणात तथ्य नसल्याचे पोलिसांनी पुन्हा अधोरेखित केले आहे. नेमके प्रकरण काय? पोलिस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, छत्रपती संभाजीनगरची एका मिसिंग महिलेची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास करण्यासाठी पोलिस पुण्यात आले होते आणि त्यांना आम्ही दोन दामिनी मार्शल दिले. कोथरूड पोलिस स्टेशनला त्यांनी पत्र देऊन महिला कर्मचारी गरज असल्याचे सांगितले होते, तसा लेखी अर्ज दिला होता. महिला सहाय्यता कक्ष आणि हिरकणी कक्ष या ठिकाणी या महिलेची चौकशी केली. यात मिसिंग मुलगी होती ती ट्रेस झाली आणि तिचे वन स्टॉप सेंटर कोंढव्यात होते हे दिसून आले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे जे पथक होते ते पथक मुलीला घेऊन निघून गेले. पुढे बोलताना संभाजी कदम म्हणाले, त्यानंतर पहाटे पोलिसांनी आम्हाला मारहाण केल्याची तक्रार संबंधित मुलींनी केली होती. यात प्रथमदर्शनी कोणतेही तथ्य आढळून आले नाही. अनेक कार्यकर्ते पोलिस आयुक्तालयात आले तिथेही त्यांना यात तथ्य नसल्याचे सांगितले. या संदर्भात सगळ्यांना लेखी पत्र देऊन देखील कळवण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिस कर्मचारी प्रेमा पाटील यांचा काहीही संबंध नाही, त्या ना संबंधित पथकात होत्या ना दामिनी मार्शल पथकाचा भाग होत्या, असे स्पष्ट करत पोलिस उपायुक्तांनी मुलींनी केलेल्या आरोपांमध्ये कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे सांगितले. तसेच, या संपूर्ण प्रकरणात काही प्रशासकीय त्रुटी असून त्याचा सध्या तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.