कल्याण पूर्वचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिस ठाण्यात शिंदे सेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात माजी आमदार गणपत गायकवाडांसह तिघांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते तळोजा कारागृहात आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी दिली होता. महेश गायकवाड यांनी त्यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, मात्र सुलभा गायकवाड यांनी विजय मिळवत कल्याण पूर्व मधील गायकवाड कुटुंबाची सत्ता कायम ठेवली. या प्रकरणी पुढील कायदेशीर लढाईत काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या प्रकरणात पुरवणी चार्जशीट मधून आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचे नाव वगळण्यात आले होते. वैभव गायकवाड विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. ही घटना उल्हास नगर हिल लाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमध्ये घडली होती. तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड अद्याप तुरुंगात असून, त्यांच्यासह काही इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. सुरुवातीला या प्रकरणात गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले होते. आमदार गणपत गायकवाडांचे गोळीबार प्रकरण काय? शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यात काही गुंठे जमिनीवरुन वाद सुरू होता. हे प्रकरण 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोघे पोलिस ठाण्यात आले होते. गणपत गायकवाड यांनी रागाच्या भरात महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. दोघांमध्ये द्वारली गावातील जमिनीवरुन वाद महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यामध्ये राजकीय शीतयुद्ध सुरु होते. घटनेच्या काही महिन्यांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावातील जमिनीवरुन दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत शिंदे गटाकडून पाडण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये गेले. याच दरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर पोलिस निरीक्षकाच्या केबिनमध्ये हल्ला केला होता. यादरम्यान पाच ते सहा गोळ्या चालवण्यात आल्या होत्या.