वरळी येथील 61 वा हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच दोघांनी घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘खालिद का शिवाजी’ नामक चित्रपटाला विरोध करत या घोषणाबाजी करण्यात आल्याचे समोर आले आहे. खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून ही घोषणाबाजी करण्यात आली असल्याचे समजते. घोषणाबाजी झाल्यावर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वरळी येथे 61 वा हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दोघांनी ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये तसेच या चित्रपटाला विरोध करण्यासाठी घोषणाबाजी केली. घोषणाबाजी ऐकल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी, तुमचे म्हणणे मांडले आहे, कार्यक्रम खराब करू नका, असे आवाहन केले. त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. ‘बंद करा बंद करा इतिहासाच्या विकृती बंद करा’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम खराब करू नका असे आवाहन फडणवीस यांनी केले. खालिद का शिवाजी या चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे. हिंदू महासभेने देखील या चित्रपटाला विरोध केला आहे. रायगडावर मशीद नसताना देखील त्या ठिकाणी मशीद दाखवली जात आहे. हे इतिहासाचे विकृतीकरण सुरू आहे. त्यामुळे आमचा या चित्रपटाला विरोध असल्याचे घोषणाबाजी करण्यांनी म्हटले आहे. कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील तसेच मराठी चित्रपटाला योगदान देणाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनुपम खेर यांचे देखील कौतुक केले. तसेच अनुपम खेर यांनी माझा डायलॉग चोरलेला आहे, ते म्हणाले ‘मी पुन्हा येईन’ याचा कॉपीराइट माझ्याकडे आहे, असे फडणवीस यांनी म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पिकला. मुक्ता बर्वेचे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दखल घेत तिच्या कामाचे कौतुक केले. त्यांचा मोनोलॉग हा अप्रतिम आहे, असे फडणवीस म्हणाले. महेश मांजरेकर यांचा फक्त आवाजच खूप आहे, नुसत्या आवाजानेच जे घायाळ करतात, त्यांच्या प्रत्येक रोलमध्ये जी ताकद ते टाकतात हे अप्रतिम आहे. त्यांचा सत्कार करण्याची संधी आम्हाला मिळाली हे मी माझे भाग्य मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.