हिंगोली जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी शासनाच्या नियमाप्रमाणेच रक्कम घ्यावी, लाभार्थींकडून जादा रक्कम घेतल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शनिवारी ता. 9 दिला आहे. हिंगोली जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रावर काही ठिकाणी जादा रक्कम घेतल्या जात असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. या शिवाय अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे कामासाठी आलेल्या लाभार्थ्यांना बराच वेळ उभे रहावे लागत होते. विशेषतः महिला वर्गाला याचा मोठा त्रास होत होता. या तक्रारी नंतर जिल्हाधिकारी गुप्ता यांनी शनिवारी ता. 9 सुट्टीच्या दिवशी सकाळपासूनच आपले सरकार सेवा केंद्राला भेट देण्यास सुरवात केली. हिंगोली शहरातील तसेच ग्रामीण भागातील आपले सरकार केंद्रांना भेट देऊन त्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी बहुतांश ठिकाणी लाभार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून आले तर अनेक ठिकाणी कोणत्या प्रमाणपत्रासाठी किती शुल्क भरावे लागते याचा फलक आढळुन आला नाही. याप्रकारामुळे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. पुढील सात दिवसांत सर्व आपले सरकार सेवा केंद्रावर लाभार्थीसाठी सुविधा उपलब्ध करा, प्रत्येक केंद्रावर शुल्काबाबतचे फलक लावावेत. प्रमाणपत्रासाठी शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणेच शुल्क आकारावे. लाभार्थ्यांकडून जादा शुल्क आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी केंद्र चालकांना दिला आहे. या शिवाय ज्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर झाले त्याच ठिकाणी चालवले पाहिजे. एका ठिकाणी मंजूरी अन दुसऱ्याच ठिकाणी केंद्राची उभारणी हा प्रकार चालणार नाही. पुढील काही दिवसांत याबाबतही तपासणी करणार असून मंजुरीच्या जागेवर सुरु नसलेले आपले सरकार सेवा केंद्र रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उमाकांत मोकरे यांची उपस्थिती होती.