कोलकातामध्ये मतभेद मिटता मिटेनात:ममता दारात वाट पाहत थांबल्या, डॉक्टर थेट प्रक्षेपणासाठी अडलेले

पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणात तीन वेळा चर्चेचे निमंत्रण नाकारल्यानंतर आंदोलक ज्युनियर डॉक्टर शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. तत्पूर्वी ममता दिवसा स्वत: आंदोलनस्थळी डॉक्टरांपर्यंत पोहोचल्या. त्या म्हणाल्या, ‘मी तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून नाही तर दीदी म्हणून भेटायला आले आहे. मला वेळ द्या. मी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. यानंतर डॉक्टरांनी त्यांना भेटण्याचे मान्य केले. मात्र, डॉक्टर नियोजित वेळेपेक्षा ४५ मिनिटे उशिराने मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले. डीजीपी राजीव कुमार व मुख्य सचिव मनोज पंत यांच्यासह ममता डॉक्टरांची वाट पाहत होत्या. तेथे पोहोचल्यानंतर डॉक्टर बैठकीचे थेट प्रक्षेपण करण्याच्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे रात्री नऊपर्यंत चर्चा सुरू होऊ शकली नाही. नंतर ममताच घराबाहेर पडल्या आणि डॉक्टरांशी चर्चा केली. त्या म्हणाल्या, हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुरू आहे, त्यामुळे संभाषणाचे लाइव्ह स्ट्रीमिंग करता येणार नाही. बैठकीच्या व्हिडिओग्राफीसाठी तयार आहे. कोर्टाने परवानगी दिली तरच रेकॉर्डिंग प्रसिद्ध केले जाईल. याआधी गुरुवारीही ममता तब्बल दोन तास वाट पाहत राहिल्या, मात्र डॉक्टर चर्चेसाठी आले नव्हते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment