नांदेड परिक्षेत्रात एक महिन्यात तब्बल 16 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त:9 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, मतमोजणीसाठीही मोठा पोलिस बंदोबस्त राहणार

नांदेड परिक्षेत्रात निवडणुक प्रक्रियेच्या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत पोलिसांनी १६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये रोख रकमेसह दारू, गुटखा आदीचा समावेश आहे. या शिवाय ९००० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आता प्रशासनाकडून मतमोजणीसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची तयारी सुरु झाली आहे. नांदेड परिक्षेत्रात नांदेड, हिंगोली, लातुर, परभणी जिल्हयाचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीचे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, परभणीचे रवींद्रसिंह परदेशी, नांदेडचे अबिनाश कुमार, लातुरचे पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांनी आपापल्या जिल्हयात वेळोवेळी विशेष मोहिम राबविल्या आहेत. या मोहिमेत दारु, गुटखा, रोख रक्कम वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १६ कोटी ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये नांदेड जिल्हयात ८.५६ कोटी, परभणी १.६० कोटी, हिंगोली ३.१७ कोटी, लातुर जिल्हयात २.७३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या शिवाय परवानाधारक असलेल्या ३१२२ पैकी २७९७ जणांकडून शस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९००० समाज कंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून कारवाईची हि मोहिम आणखी काही दिवस चालणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. आता विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी ता. २३ होणार असून मतमोजणी केंद्राच्या परिसरात तसेच संवेदनशील गावांमधून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

  

Share