सामान्यांकडून पशुपक्ष्यांसाठी अन्नपाण्याची सोय:जनावरांसाठी अनेक घरी बनवतात २ जादा पोळ्या, अंगणाबाहेर ठेवतात पाण्याचे टाके‎

प्रतिनिधी | अमरावती उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, पक्षी, प्राणी हे अन्न, चारा, पाण्यासाठी भटकत असल्याचे दिसून येत आहे. पशुपक्षी आणि मोकाट प्राण्यांसाठी सर्वसामान्यही आता सरसावले असून, घराच्या अंगणात लहानसे पाण्याचे टाके भरून ठेवले जात आहे. तसेच अनेक घरांमध्ये दोन जास्तीच्या पोळ्या करून त्या श्वान, गाय, म्हैस, बकऱ्या, शेळ्यांना खाऊ घालत आहेत. पक्ष्यांसाठीही जलपात्र भरून ठेवत त्यांच्यासाठी गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारीचे पात्रही अंगणात ठेवले जात आहे. जीवदया ही आपली संस्कृती असल्याने अनेकजण न विसरता दररोज पशुपक्ष्यांसाठी अन्नाची सोय करत आहेत. आजवर सामाजिक संस्था असे कार्य करण्यासाठी पुढाकार घ्यायच्या. परंतु, सर्वसामान्यांमध्येही जागृती झाली असून, तेही जिव्हाळा, प्राणीदया किंवा कर्तव्य म्हणून पशुपक्ष्यांच्या अन्न, पाण्याची सोय करत आहेत. अनेकांनी त्यांच्या अंगणात अन्नपात्र, जलपात्र ठेवले आहेत. काहींनी लहान टाके तर काहींनी मोठे टाके विकत आणून ते अंगणाबाहेर ठेवले असून, दररोज ते पाण्याने भरले जाते. त्यातील पाणी पिण्यासाठी मोठ्या संख्येत गायी, बैल, श्वान, मेंढ्या, पक्षी, म्हैस येत आहेत. सणासुदीला गायीला नैवेद्य देण्याची पद्धत आहे. त्याऐवजी दररोज काही ना काही या मुक्या प्राण्यांना दिले तर त्याचे आत्मिक समाधान मिळते. त्यांनाही मनुष्याप्रमाणेच तहान, भूक लागते. याची जाणीव झाल्यामुळे विशेषत: उन्हाळ्यात चारा, पाणी फारच कमी प्रमाणात मिळत असल्याने शक्य होईल तेवढी पशुपक्ष्यांच्या अन्न, पाण्याची सोय करतो, अशी माहिती अनेक नागरिकांनी दिली. तसेही बरेच अन्न शिळे राहते ^पाळीव, मोकाट जनावरे असोत किंवा पक्षी उन्हाळ्यात त्यांना अन्न मिळत नाही. म्हणून त्यांच्यासाठी दररोज पोळ्या, तांदूळ, बाजरीची सोय करते. जलपात्रात पिण्याचे पाणी ठेवते. त्यांनाही अन्न मिळावे, तेही व्यवस्थित राहावेत, हा उद्देश आहे. तसेही घरी बरेचदा अन्न शिळे राहते. त्याऐवजी ताजेच जनावरांना द्यायला हवे. -वैशाली आसलकर, श्रीकृष्ण कॉलनी. मोकाट जनावरे खायला मिळाले नसल्यास उकीरड्यावर जातात जनावरे मोकाट असली तरी ती नेहमीच आपल्या अंगणात असतात. त्यांना दररोज बघून त्यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण होतो. श्वान, गायी, बकऱ्या हे प्राणी काही खायला मिळाले नाही की, उकीरड्यावर जे मिळेल ते खातात. म्हणून त्यांना चांगले खायला देण्यासाठी दोन पोळ्या जास्तीच्या तयार करते व त्यांना खाऊ घालते. -जया पांडे, किरण कॉलनी.

  

Share