समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंढरपूरच्या वारी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचा गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी आझमी यांना थेट इशाराच दिला आहे. कोल्हापूरच्या कातड्याची चप्पल हाणून त्यांचे तोंड फोडल्या शिवाय शिवसैनिक शांत बसणार नसल्याचे कोळी यांनी म्हटले आहे. या संदर्भात बोलताना कोळी म्हणाले की, आझमी हे जर राजकीय विषयावर बोलले असते, तर त्याची दखल देखील घेतली नसती. मात्र, पांडुरंगाच्या वारीवर केलेली टीका खपवून घेणार नाही, असा इशारा कोळी यांनी दिला आहे. आझमी हे ज्या पद्धतीने बोलले आहेत, त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या कातड्याची चप्पल हाणून त्यांचे तोंड फोडल्या शिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशारा कोळी यांनी दिला आहे. ती संदर्भात बोलताना कोळी म्हणाले की, आझमी यांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी समाज आणि हिंदू यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याला शिवसैनिक कधीच माफ करणार नाही. ते ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी त्यांना चपलांचा हार घालण्यात येईल. कोल्हापूरच्या चपलेने त्यांचे तोंड फोडले जाईल, असे देखील कोळी यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नेमके काय म्हणाले होते अबू आझमी? समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटे रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केले, तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितले लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते, असे अबू आझमी म्हणाले. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.