हिंगोलीत शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवले:आमदार बांगरांकडून डॉक्टरांची पाठराखण, म्हणाले – त्यांचे काहीही चुकलेले नाही, येणाऱ्या बातम्या चुकीच्या
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या 43 महिलांना जमिनीवर झोपवण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावरून विरोधकांना सरकारला धोरवर धरले असून टीका केली जात आहे. परंतु, या सर्व प्रकारानंतरही शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी रुग्णालयातील डॉक्टरांची पाठराखण केली. रुग्णालयाबाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या असून येथील डॉक्टर कर्तव्यदक्ष आहेत. आमच्याकडे बेड कमी आहेत. त्यामुळे तिथे हॉल साफ करून गाद्या टाकत पेशंटला ठेवले होते. डॉक्टरांनी केलेले काम चांगले आहे, असे संतोष बांगर म्हणाले. हिंगोलीतील आखाडा बाळापूर रुग्णालयात शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपवल्याने झालेल्या त्रासाच्या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच या ठिकाणी तत्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता संतोष बांगर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांची पाठराखण केल्याने विरोधक काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काय म्हणाले संतोष बांगर?
आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील येणाऱ्या बातम्या खरंच चुकीच्या असून तेथील डॉक्टर अतिशय कर्तव्यदक्ष असल्याचे संतोष बांगर म्हणाले. हिमायतनगर, हदगाव भागातील रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे डॉक्टर तसेच संपूर्ण स्टाफ अतिशय चांगला असून या दवाखान्यात खूप चांगले काम होत असल्याचा दावा संतोष बांगर यांनी केला. बेड कमी असल्याने जमिनीवर ठेवले
आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात 120 रुग्णांचे ऑपरेशन पार पडले. त्यात 43 ऑपरेशन हे जास्तीचे झाले आहेत. आमच्याकडे बेड कमी असल्यामुळे त्या ठिकाणी हॉल साफ करून गाद्या टाकून पेशंटला तिथे ठेवले होते, असे संतोष बांगर यांनी सांगितले. कुठलीही कारवाई करण्याचे काम नाही
डॉक्टरांनी केलेले काम खरंच चांगले आहे. तिथे फक्त कॉट कमी होते. त्यामुळे हा काही मोठा विषय नाही. पेशंटला ज्या ठिकाणी ठेवले होते, ती जागा अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ केली होती. तुम्हाला काय करायचे ते करा, असे मी अधिकाऱ्यांना सांगून ठेवले होते. या ठिकाणी डॉक्टरांचे काहीही चुकलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात कुठल्याही प्रकारच्या कारवाईचे काम नाही, असेही बांगर म्हणाले. हे ही वाचा… हिंगोलीत शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना जमिनीवर झोपवलं:आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार, विरोधकांकडून सरकारवर टीका आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या 43 महिलांची कॉट नसल्यामुळे चक्क जमीनीवर गाद्या टाकून झोपण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे काडक्याच्या थंडीत महिला चांगल्याच गारठल्या गेल्या. या प्रकारामुळे नातेवाईकांमधून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. सविस्तर वाचा…