अत्याचार आणि हत्येनंतर ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये ठेवला होता?:आरजी कर प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्टवरून नवा प्रश्न
कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमधील २४ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. घटनेच्या चार महिन्यांनंतर आलेल्या सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या दुसऱ्या अहवालात आढळले की, १० ऑगस्ट २०२४ रोजी डॉक्टरचा मृतदेह सापडलेल्या सेमिनार हॉलमध्ये संघर्षाचा पुरावाच सापडला नाही. मृताच्या शरीरावरील जखमांवरून त्या सेमिनार हॉलमध्ये संघर्षाचे कारण ठराव्यात, अशा नाहीत. त्यामुळे दुसरीकडे डॉक्टरला अमानुष मारहाण करून नंतर मृतदेह सेमिनार हॉलमध्ये ठेवला का, असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. घटनेच्या दिवशी कोलकाता पोलिसांनी हॉलमधून मृताचे ओळखपत्र, फाटलेली कागदपत्रे, केसांसह ४० गोष्टी ताब्यात घेत फॉरेन्सिककडे पाठवल्या होत्या. परंतु, सीएफएसएल अहवालामुळे सीबीआय व पोलिस गोत्यात आले. कारण ते सेमिनार हॉलच घटनास्थळ मानत होते. मृताचे वडील म्हणाले- सीबीआयवर विश्वास नाही, सविस्तर चौकशी व्हावी मृताच्या वडिलांनी भास्करला सांगितले – आम्ही आधीपासूनच सांगत आहोत की सेमिनार हॉलमध्ये बलात्कार व खून झाला नाही. आमचा सीबीआयवर विश्वास नाही. घटनेची सखोल चौकशी व्हावी. दरम्यान, कुटुंबीयांच्या याचिकेवर मंगळवारी हायकोर्टात सुनावणी झाली. सीबीआयवर नाराज डॉक्टर रस्त्यावर आरजी कर प्रकरणात सीबीआयच्या अपयशामुळ कनिष्ठ डॉक्टर पुन्हा धरणे आंदोलन करत आहेत. मृताला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आरोपी माजी प्राचार्य संदीप घोष आणि टाळा ठाण्याचे प्रभारी अभिजित मंडल यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केेले नाही. सीएफएसएलच्या अहवालाने तपास यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित केले. कनिष्ठ डॉक्टर संतप्त झाले. न्यायासाठी त्यांनी ४३ दिवस आंदोलन केले. १६ दिवस उपोषण केले. आता तिसऱ्यांदा धर्मतल्लामध्ये धरणे देत आहेत. बंगाल ज्युनियर डॉक्टर्स फ्रंटचे डॉ. देवाशिष हलदार म्हणाले, सीबीआय पुरवणी आरोपपत्र का दाखल केले नाही हे सांगत नाही? आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू.