विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाइलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधकांनी अधिवेशनात या विरोधात जोरदार आवाज उठवत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर कोकाटे यांनी आपण मोबाइलवर आलेली जाहिरात स्कीप करत होतो, रमी खेळत नव्हतो, असे म्हटले होते. आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत माणिकराव कोकाटे हे 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा दावा केला आहे. रोहित पवार म्हणाले, कृषिमंत्री सभागृहात केवळ 42 सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून, हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे रोहित पवार म्हणतात, सभागृहात तब्बल 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असे पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये अजित पवारांच्या दालनात बैठक झाली. यावेळी अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचल्याचे समजते. तसेच किती वेळा माफ करायचे, आता माझ्या हातात काही नाही, असे म्हणत माणिकराव कोकाटे यांना इशारा दिला असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद टाळला होता. तसेच राजीनामा नाही तर खाते बदलण्यात येणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत.