अजित पवार म्हणाले- बारामतीकरांनी अशी बटणं दाबली:अन् करिश्मा करून दाखवला, पण मतमोजणी सुरू झाली तेव्हा तर मीडियाने कहरच केला होता

बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही सगळेच काळजीमध्ये होतो. आमच्या भागातील एकतर्फी कौल देईल असे आम्हाला वाटले नव्हते. लोकसभेत पराभव झाला तेव्हा आम्ही कधी ईव्हीएमला दोष दिला नाही. त्यामुळे आम्ही नव्या जोमाने तयारीला लागलो. यात विशेष म्हणजे आम्ही जनतेसाठी काय देऊ शकतो याचा आम्ही विचार केला यात लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची ठरली. यावरून देखील विरोधकांनी टीका केली. मात्र आम्ही करून दाखवले आहे. अजित पवार म्हणाले, मला तुमचे आभार द्यायला यायचे होते मात्र कामांमुळे मला येता आले नाही, अन्यथा मी 14 तारखेला बारामतीकरांच्या जनतेसमोर नतमस्तक व्हायचे ठरवले होते. माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. बारामतीकरांचा प्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध राहील अशी मी ग्वाही देतो. लोकसभेत जे झाले त्यामुळे सर्वच आम्ही काळजी करत होतो की विधानसभेत कसे होणार. आमच्या यात्रेत आम्ही ठरवले होते की कोणावर देखील टीका करायची नाही आणि जनतेला केवळ आवाहन करत होतो आणि सगळ्यांचे ऐकायचे काम मतदार राजा करत होता. तसेच पंतप्रधान मोदी देखील महाराष्ट्र पिंजून काढत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणुकीपासून ज्या निवडणुका झाल्या कधीही कॉंग्रेस एकसंघ असताना विरोधक इतके असताना एवढे मतदान झाले नव्हते जेवढे या विधानसभेत आम्हाला मत मिळाले. सकाळी जेव्हा मतमोजणी सुरू झाली तेव्हा तर मीडियाने कहरच केला, अजित पवार पिच्छाडीवर. हे ऐकून आमची आई देवघरातच जाऊन बसली. नंतर मी एकाला कॉल केला तेव्हा समजले की आपण प्रचंड लीडने पुढे जात असल्याचे समजले. 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून बारामतीकरांनी करिश्मा करून दाखवला, असे अजित पवार म्हणाले.

  

Share