अकोल्यातील एजंटकडून 60 हजारांचा नायलॉन मांजा जप्त:अमरावतीत पुरवठा; शहरात एका विक्रेत्याला पकडले होते

फ्रेजरपुरा पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी योगायोग कॉलनीतून एका विक्रेत्याला पकडून त्याच्याकडून साडेबारा हजारांचा जीवघेणा नायलॉन मांजा जप्त केला होता. त्याची चौकशी केली असता त्याला या मांजाचा पुरवठा अकोल्यातून झाल्याचे समोर आले. त्यामुळे फ्रेजरपुरा मांजा पाठवणाऱ्या एजंटला पोलिसांनी अकोल्यात जाऊन पकडले. त्याच्याकडून ६० हजारांचा मांजा जप्त केला. विशाल संतोष वरोकार (२३, रा. मोठी उमरी, अकोला) असे अमरावतीत नायलॉन मांजाचा पुरवठा करणाऱ्या एजेंटचे नाव. फ्रेजरपुरा पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी हद्दीतील योगायोग कॉलनीतील एका विक्रेत्याकडून साडेबारा हजारांचा मांजा जप्त केला होता. त्याने हा मांजा अकोल्यातील विशाल वरोकार याच्याकडून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिस विशाल वरोकारच्या शोधात अकोल्यात गेले. तो मांजाचा एजंट असल्याचे समोर आले. तो मुख्य विक्रेत्यांकडून चिल्लर विक्रेत्यांना मांजा उपलब्ध करून देतो आणि दलाली घेतो, तसेच काही मांजा स्वत:कडे ठेवतो, असेही पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करून ६० हजारांचा मांजा जप्त केला. ही कारवाई फ्रेजरपुराचे पीएसआय राहुल महाजन, डीबीचे प्रमुख सुभाष पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे. मांजाची विक्री करताना एकाला पकडले, ७० हजारांचा ऐवज जप्त अमरावती | मानवासह पशुपक्ष्यासांठी घातक असलेल्या नायलॉन मांजाची विक्री व साठवण करण्यावर बंदी घालण्यात आली. आहे. यापूर्वी नायलॉन मांजामुळे काही नागरिकांच्या जीवावर बेतले होते. असे असतानाही शहरातील काही विक्रेते नायलॉन मांजाची खुलेआम विक्री करत असल्याचे मागील आठ दिवसांत पोलिसांनी केलेल्या कारवायांवरून समोर आले. दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने गाडगे नगर ठाण्याच्या हद्दीतील ट्रान्सपोर्टनगर परिसरात एकाला नायलॉन मांजा विक्री करताना पकडले. त्याच्याकडून ४३ हजारांच्या मांजासह दुचाकी व इतर साहित्य असा ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिसांनी बुधवार, ११ डिसेंबरच्या रात्री केली आहे. इजाजुद्दीन सैफुद्दीन (४५, रा. हबीबनगर, क्रमांक २, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. इजाजुद्दीन दुचाकीवर मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला पकडून नायलॉन मांजाचे ४३ चक्र जप्त केले. तसेच दुचाकी, मोबाइल व मांजा विक्रीतून आलेली रोख असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे एपीआय महेश इंगोले व त्यांच्या पथकाने केली आहे.

  

Share