अमेरिकेच्या डल्लासमध्ये रंगणार मराठी बांधवांचा मैत्री मेळावा:1500 हून अधिक महाराष्ट्रीयन येणार एकत्र, या वीकएंडला रंगणार विविध कार्यक्रम

अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डल्लासमध्ये यंदाचा वीकेण्ड मराठमोळ्या आनंदाचा, गप्पांचा ठरणार आहे. टेक्सासमधील विविध शहरांमधील महाराष्ट्र मंडळातील स्थानिक येत्या शनिवार आणि रविवारी म्हणजे 19 आणि 20 एप्रिल रोजी मैत्री मेळावा साजरा करणार आहेत. डल्लासमध्ये या मैत्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी 1500 हून अधिक मराठी मंडळी एकत्र येतील. डल्लास फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून हा मेळावा होईल. स्थानिक महाराष्ट्र मंडळाच्या पलीकडे आपले वर्तुळ वाढवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैत्री मेळाव्यात भारतातून ‘जर तर ची गोष्ट’ हे प्रिया बापट व उमेश कामत यांचे गाजलेले नाटक, देवकी पंडित यांच्या सुरेल गाण्याची मैफल तसेच ओमी वैद्य (थ्री इडियटस फेम) यांच्या स्टँडअप कॉमेडीचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ‘राजा शिवछत्रपती’ हे भव्य नाटक डल्लासमधील स्थानिक कलाकार सादर करतील. यामध्ये वेगळ्या पद्धतीने ऑडिओ / व्हिडीओ शाहिरी आणि ओघवते कथाकथन असणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी लघुनाट्य व नृत्यकथा हे खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. ‘सर्वांसाठी सगळं’ हे या उपक्रमाचे सूत्र आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत करमणुकीपासून वैचारिक आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात टेक्सासमधील विविध मराठी शाळेतील मुले आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतील. उत्तररंग हा कार्यक्रम खास ज्येष्ठ नागरिकांसाठी होईल. तर, टेक्सासमधील मराठी उद्योजकांसाठी बिझनेस कनेक्ट, जोडीदार निवडीसाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाचा रेशीमगाठी हा कार्यक्रम होईल. टेक्सासमधील डॉक्टरांच्या नेटवर्किंगचाही यातून प्रयत्न होणार आहे. विविध कार्यक्रमांबरोबरच विविध खाद्यपदार्थांचीही रेलचेल असणार आहे. प्रसिद्ध शेफ व ‘विष्णुजी की रसोई’चे संस्थापक विष्णू मनोहर या सोहळ्याला उपस्थित राहतील. कार्यक्रमाची सांगताही आगळ्यावेगळ्या पद्धतीने होईल, अशी माहिती डल्लास फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा शामली असनारे आणि सचिव राहुल पाडळीकर यांनी केले.

  

Share