सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात साचलेल्या पाण्यात बसून ‘आम्हाला पंचनामा नको, नुकसानभरपाई नको, फक्त हमीभाव द्या,’ अशी आर्त हाक राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिली आहे. मोहोळ तालुक्यातील लखन माने या युवा शेतकऱ्याने आपल्या शेतातील साचलेल्या पाण्यात बसून हमीभाव द्या, अशी मागणी केली आहे. बुधवारी दिनांक 6 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने उभे पीक आडवे झाले आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मोहोळ तालुक्यातील युवा शेतकरी लखन माने यांच्या 2 एकरवरील टोमॅटो पिकाच्या बागेत पाणी साचले आहे. यामुळे जवळपास 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. या परिस्थितीत माने यांनी राज्य शासनाकडे व्यथा मांडली. लखन माने यांनी आपल्या शेतात झालेल्या नुकसानीवरून नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, कोणी रम्मी खेळतोय, कोणी मारामारी करतोय, कोणाचा बार आहे यावरच चर्चा होते. पण आमच्या शेतीची कोणालाही फिकीर नाही. राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक केवळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत, पण शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आम्हाला पंचनामे नकोत, नुकसानभरपाई नको तर हमीभाव द्या, अशी मागणी लखन माने यांनी केली आहे. सोलापूरमध्ये सरासरी 72.7 मिमी पावसाची नोंद काल सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. शहरात सरासरी 72.7 मिमी पावसाची नोंद झाली, ज्यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः बाळे परिसरातील संतोषनगर आणि तोडकर वस्तीमध्ये तब्बल 80 घरे पाण्याखाली गेली. घरात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबांना रात्रभर सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला. या पावसामुळे घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही जोरदार पाऊस झाला. यामध्ये शेळगीमध्ये सर्वाधिक 89.8 मिमी पाऊस झाला, तर सोलापूर शहरात 82.5 मिमी पावसाची नोंद झाली. तिन्हे महसूल मंडळात 67 मिमी, दक्षिण सोलापुरात 36.6 मिमी आणि मोहोळमध्ये 38.4 मिमी पाऊस झाला. सांगोल्यात 29.5 मिमी, अक्कलकोटमध्ये 25.2 मिमी, बार्शीत 24.3 मिमी, पंढरपुरात 20.9 मिमी, माळशिरसमध्ये 20.5 मिमी, माढ्यात 18.4 मिमी आणि मंगळवेढ्यात 16 मिमी पावसाची नोंद झाली आहे.