अमरावती विद्यापीठाच्या 5 कोटी रुपयांच्या ग्रंथालयाचे काम रखडले:रुक्मीणीनगर परिसरातील इमारत पूर्ण, पण फर्निचरअभावी बंद

अमरावतीतील रुख्मिणीनगर परिसरात विद्यापीठाच्या नवीन ग्रंथालय आणि अभ्यासिकेची इमारत बांधून तयार आहे. मात्र फर्निचर आणि इतर सुविधांअभावी ती अद्याप विद्यार्थ्यांसाठी बंद आहे. सिनेट सदस्य प्रा. कैलास चव्हाण यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय उन्नत शिक्षण अभियान (रुसा) अंतर्गत या इमारतीसाठी ४ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मिळाला. एकूण बांधकामावर सुमारे ५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सिनेट सभेत प्रा. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय मांडली. सध्या अनेक पदवीधर आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी बाहेरील संस्थांवर पैसे खर्च करावे लागत आहेत. कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांनी या प्रश्नाची दखल घेतली आहे. त्यांनी विद्यापीठाच्या बांधकाम, भांडार आणि ग्रंथालय विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत समोर आले की महानगरपालिकेकडून इमारत हस्तांतरणात विलंब झाल्यामुळे फर्निचर आणि इतर कामे रखडली. विद्यापीठ प्रशासनाने आता या कामांसाठी ९० लाख रुपयांची तरतूद केली आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार पुढील शैक्षणिक सत्रापासून ही इमारत विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे. विद्यार्थी आणि पदवीधरांना याचा मोठा लाभ होणार आहे.

  

Share