आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण:विवस्त्र करत महिलेसोबत बनवला आक्षेपार्ह व्हिडिओ, धमकी देत केली 10 कोटींची मागणी

शिरूर हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) उमेदवार अशोक पवार यांच्या ३० वर्षीय ऋषिराज पवार या मुलाचे अपहरण करून, त्याला जबरीने विवस्त्र करून व तिथे एका स्त्रीला आणून तिला विवस्त्र करून अश्लील व्हिडिओ फोटो काढण्यात आले ते व्हायरल करण्याची धमकी देत दहा कोटीची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे .याप्रकरणी ऋषीराज पवार यांनी चार आरोपी आणि एक अज्ञात महिला यांच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेत आमदार यांच्या कन्या आम्रपाली पवार, ऍड असीम सरोदे ,ऍड श्रेया आवळे, ऍड संदीप लोखंडे उपस्थित होते. तर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ऋषिराज पवार आणि आमदार अशोक पवार यांनी भावना व्यक्त केल्या. याबाबत पवार यांचे वकील असीम सरोदे म्हणाले, ज्ञानेश्वर कटके हे शिरूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून निवडणूक लढत आहे. अशोक पवार यांचे कार्यकर्ते भाऊ कोळपे याने ऋषिराज पवार यास सांगितले की, काही कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी एका महत्वाची बैठकीसाठी मांडवगण फराटा येथे शनिवारी दुपारी दोन वाजता घेऊन गेले. त्याठिकाणी त्याला एका घरात नेऊन डांबून ठेवत त्याला धमकावून त्याचे हात- पाय बांधून विवस्त्र करण्यात आले आणि त्याठिकाणी एका महिलेस आणून तिला विवस्त्र करण्यात आले आणि आक्षेपार्ह फोटो काढण्यात आले. त्याला तीन आरोपी म्हणाले, तुमच्या विरोधातील लोक आमच्या संपर्कात असून तुझे अश्लील व्हिडिओ व्हायरल करून पैसे मिळवू. आम्हाला दहा कोटी रुपये दे तरच आम्ही हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करणार नाही अशी धमकी दिली. माझ्याकडे पैसे आत्ता नाही मी त्याबाबत व्यवस्था करतो असे त्याने सांगितले. मात्र,आरोपी यांनी त्यास धमकावले त्यावेळी दुसऱ्या ठिकाणी जाताना ऋषिराज याने त्याच्या मित्रांना बोलवून घेतले त्यांनी एका आरोपीस पकडून ठेवले आणि मोबाईल खेचून घेत त्यातील फोटो आणि व्हिडिओ स्वतःकडे घेतले. या घटनेने मानसिक दबाव मध्ये त्याच्यासह कुटुंबीय आहे. यामध्ये जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याबाबत निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे त्यासाठी आम्ही तक्रार दाखल करत आहे. अशोक पवार म्हणाले, राजकारण किती खालच्या स्तरावर गेले आहे यातून हे दिसून येते. मुलाचे अपहरण करणे, त्यास डांबून ठेवणे, कपड्याने गळा आवळणे, सुरा लावणे, धमकावणे, विवस्त्र करणे या गोष्टी घृणास्पद आहे. पोलिसांनी याबाबत सूत्रधार याचा शोध घ्यावा. या घटनेचा मी निषेध व्यक्त करत आहे.

  

Share