पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका 39 वर्षीय तरुणाला गावातच दिवसाढवळ्या घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली, आणि त्यानंतर त्याच्या पत्नीचे लोकांनी अपहरण केले. तरुणीच्या आई आणि भावानेच हे धक्कादायक कृत्य केले आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणाचे नाव विश्वनाथ बबन गोसावी असून तो सध्या गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मारहाण आणि अपहरण आंतरजातीय प्रेमविवाहामुळे घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नेमके प्रकरण काय? विश्वनाथ गोसावी याचे प्राजक्ता (वय २८) या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या घरच्यांचा विश्वनाथ आणि प्राजक्ताच्या नात्याला विरोध होता. असे असतानाही दोघांनी काही दिवसांपूर्वी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह केला. मात्र, हा आंतरजातीय विवाह प्राजक्ताच्या कुटुंबियांना मान्य नव्हता. मुलीने पळून जाऊन आंतरजातीय विवाह केल्यामुळे समाजात आपली बदनामी झाल्याचा राग त्यांच्या मनात होता. यातूनच त्यांनी प्राजक्ता आणि विश्वनाथ यांना आधी जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांनी प्राजक्ताचे अपहरण केले. भरचौकात ही मारहाण आणि अपहरणाची घटना घडली. घटनास्थळी उपसस्थितांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. प्राजक्ताच्या दोन भावांसह तिच्या आईने आणि इतर 15 जणांनी आधी विश्वनाथच्या घरात घुसून त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याच्या पत्नीला जबरदस्तीने घेऊन गेले. या घटनेचा एक थरारक व्हिडीओ एका स्थानिक नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला, ज्यात आरोपींचा जमाव विवाहितेला जबरदस्तीने वाहनात कोंबून नेतो आहे, हे स्पष्टपणे दिसतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. हे ही वाचा… बीड की गुन्हेगारांचा अड्डा?:शाळकरी मुलीचे अपहरण, विनयभंग करत बेदम मारहाण; बीडमधील घटनेने खळबळ बीडमधील गुन्हेगारीचे प्रकरण थांबायचे काही नावच घेत नसल्याचे दिसत आहे. एक अत्यंत धक्कादायक घटना बीडमधून समोर आली आहे. एका 16 वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण करत तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर या शाळकरी मुलीला प्लास्टिकच्या पाइपने बेदम मारहाण देखील केल्याचे समोर आले आहे. या घटनेने बीडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा… नांदेडमध्ये भरदिवसा तरुणीचे अपहरण VIDEO:दोघांनी बाइकवर उचलून नेले; पोलिसांनी पाहताच रस्त्यावर फेकले, एकाला अटक नांदेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी दिवसाढवळ्या एका मुलीचे दुचाकीवर टाकून अपहरण केले. मात्र, पोलिसांनी पाहताच तरुणांनी त्या तरुणीला रस्त्यावरच फेकून पळ काढला. नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. सविस्तर वाचा…