बारामतीतील अखेरच्या सभेत अजित पवार भावूक:आईपुढे म्हणाले – निवडणुकीत साथ द्या, प्रत्येकाला हवाहवासा वाटेल असा तालुका करेन

बारामती विधानसभा मंतदारसंघाच्या निवडणुकीच्या सांगता सभेत अजित पवारांनी भाषण करताना अनेक विषयांना हात घातला आहे. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आहे. तसेच बारामतीकरांशी संवाद साधतान अजित पवार यावेळी भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मी बारामतीकरांच्या सदिच्छा घ्यायला आलो आहे. तुम्ही मला 7 वेळा निवडून दिले आता आठव्यांदा निवडून द्या, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे. 1999 साली मला निवडणुकीत जरा भीती वाटली अजित पवार सभेत बोलताना म्हणाले, आपल्या सगळ्यांना विश्वास आहे की मागच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला प्रचंड बहुमताने निवडून दिले. तेव्हाच मी ठरवले की बारामतीकरांना सर्वात जास्त निधी मिळवून द्यायचा. माझ्या मनात अनेक संमिश्र अशा भावना आहेत. 1999 साली मला निवडणुकीत जरा भीती वाटली होती. तेव्हा राज्यात राणे आणि गोपीनाथ मुंडे यांचे सरकार होते. त्यावेळेस सर्वपक्षीय उमेदवार आदरणीय चंद्राव अण्णा उभे होते. तेव्हा अगदी एकास एक अशी लढत झाली. तेव्हा मी जरा घाबरलो, मात्र बारामतीकरांनी मला 50 हजार मताधिक्याने निवडून दिले. हा तालुका प्रत्येकाला हवाहवासा वाटावा अजित पवार म्हणाले, अनेक प्रकारच्या गोष्टी करताना मी एकच गोष्ट लक्षात ठेवली होती की बारामतीकराच्या कोणत्याही व्यक्तीच्या मदतीला आपण कमी नाही पडलो पाहिजे. हा तालुका प्रत्येकाला हवाहवासा वाटवा, या ठिकाणी निवृत्तीनंतरचे आयुष्य जगावे, इथे सुरक्षित आहे, इथे कायदा सुव्यवस्था चांगली आहे, इथे दंगली घडल्या नाहीत. मी सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जातो. हेच मी सतत डोळ्यासमोर ठेऊन काम करत आलो आहे. मुलींचे शिक्षण मोफत केले पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्यावर एकट्यावर बारामतीची जबाबदारी नाही, माझ्याकडे पक्षाची जबाबदारी आहे. महायुतीमधला घटक म्हणून जबाबदारी आहे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. जनसन्मान यात्रेच्या निमित्त मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे. महायुतीने आणलेल्या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. मुलींचे शिक्षण मोफत केले, लाडकी बहीण योजना आणली. शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. अजित पवारांनी सांगितला भावनिक किस्सा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले, मला खूप वाईट वाटत आहे. मी त्यांना विचारले काय झाले, तेव्हा त्यांनी सांगितले की आपण मुलींच्या शिक्षणाची अर्धी फीस देत आहोत. पण मला एका मुलीचे पालक भेटले, त्यांनी मला सांगितले की तुम्ही अर्धी फी भरता पण उरलेली अर्धी फी भरायला देखील आमच्याकडे पैसे नाहीत. आमच्या मुलीला मेडिकलचे शिक्षण घ्यायचे होते मात्र पैसे नसल्याने तिने आत्महत्या केली. आपण फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन जात असताना राज्याची जबाबदारी आपल्याकडे असताना आपल्यामुळे कोणी आत्महत्या करू नये असे मला वाटते. मला अर्थसंकल्प ठरवायचा होता. मी माझे फायनान्सच्या लोकांना विचारले अर्धी फी साठी आपले किती पैसे जातात त्यांनी सांगितले की साडे तीन हजार कोटी रुपये जातात. मी म्हणालो अजून साडे तीन हजार कोटी जाऊ द्या, पण शिक्षणापासून वंचित राहून कोणी आयुष्य संपवू नये, असा एक किस्सा अजित पवारांनी यावेळी सांगितला. मी मागे एकटा पडलो होतो टेक्स्टाईल पार्कमधील प्रतिभा पवार यांच्याबाबत घडलेल्या प्रकारावरही अजित पवारांनी भाष्य केले. अजित पवार म्हणाले, त्याची पूर्ण माहिती घेऊन बोलले पाहिजे. त्याचे राजकारण केले नाही पाहिजे. तसेच लोकसभा निवडणुकीची आठवण काढताना अजित पवार म्हणाले, मी मागे एकटा पडलो होतो, यावेळी माझी आई माझ्यासोबत आहे. माझ्या बहिणी माझ्यासाठी फिरत आहेत. माझ्या पोटच्या पोरांनी तर माझ्यासाठी फिरलेच पाहिजे. माझी बायकोही फिरतेय, तिने तर माझ्यासोबत असलेच पाहिजे. कारण, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांना राज्यसभा दिलीय, असा भावनिक आणि मिश्कील टोलाही अजित पवारांनी लगावला. दरम्यान, आपल्या ग्रामीण भागात बस स्थानक चांगले आहे, इतकं भोरच वाईट आहे. महिलांना विकास दाखवल्यावर एक महिला म्हणाली बाई मला माहीतच नव्हते. काम करण्याची हिंमत आणि धमक आपल्यात आहे. अजून काही करायचे बाकी आहे, त्यासाठी तुम्हाला 20 तारखेला घड्याळाचे बटन दाबावे लागेल. घड्याळाचा बटन दाबले की तुमचे काम झाले, असे आवाहन अजित पवारांनी यावेळी केले आहे.

  

Share