औरंगजेबाच्या कबरीला काँग्रेसच्या काळात संरक्षण:ती हटवण्यासाठी घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस

मोगल बादशहा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची ही कबर हटवण्यात यावी अशी मागणी होत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. औरंगजेबाच्या कबरीला काँग्रेसच्या काळात एएसआयचे संरक्षण मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. तसेच प्रत्येकाला असच वाटते की कबर हटवली पाहिजे. मात्र काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात, असेही ते म्हणाले. विकी कौशलच्या छावा चित्रपटाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. छावा चित्रपटात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ कशाप्रकारे केला याबाबत दाखवले आहे. त्यातच सपाचे आमदार अबू आझमींनी औरंगजेबावर स्तुती सुमने उधळत त्याचे कौतुक केले होते. यानंतर खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापलेत. त्यांनी औरंगजेबाची कबर ठेवण्याची काय गरज असा सवाल उपस्थित करत औरंगजेबाची कबर उखडून टाका, अशी मागणी केली होती. अनेक दिवसांपासून होत असलेल्या या मागणीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त मोठे विधान केले. कबर हटवण्याबाबत काय म्हणाले फडणवीस? औरंगजेबाच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली. काँग्रेसच्या काळात ही कबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या (ASI) संरक्षणाखाली आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या गंभीर आरोपावर आता काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. घाईघाईने कोणताही निर्णय घेता येत नाही औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे. आता कबरीला देण्यात आलेले हे विशेष संरक्षण कायद्याचे पालन करून हटवणे अथवा बदलवणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणात घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी ही कबर किती दिवस राहिल हे पाहा असे संकेत दिले आहेत. औरंगजेबाच्या कबरीवर 13 वर्षात 6.5 लाखांचा खर्च औरंगजेबाचा मृत्यू 3 मार्च 1707 साली नगरच्या भिंगार किल्ल्यात झाला. आपल्याला आपल्या गुरुच्या कबरीजवळ दफन करावे, अशी औरंगजेबाची इच्छा होती. त्यानुसार त्याचा मुलगा आझम शाह याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये त्याची कबर बांधली. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवर 13 वर्षात 6.5 लाखांचा खर्च झाला, तर शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी मात्र काही हजारांचा खर्च झाला, अशी माहिती हिंदू जनजागृती संघटनेचे सुनील घनवट यांनी दिली. तसेच त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे अनुदान रद्द करावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

  

Share