अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांचे थकीत देयक कधी देणार?:पंकज भुजबळांचा सवाल, मंत्री जाधव म्हणाले – 100 दिवसांच्या रोडमॅप कार्यक्रमाअंतर्गत वाटप पूर्ण करू
अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांचे राहिलेले थकीत देयक 100 दिवसांच्या रोडमॅप कार्यक्रमाअंतर्गत वाटप पूर्ण करण्यात येणार येईल अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. राज्यात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील उत्तरात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी माहिती दिली. आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नात म्हटले आहे की, येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर, देवळा,नाशिक तालुक्यासह जिल्हाभरात विविध ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाने शेतातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले होते. यामुळे शेतातील गहू, कांदे, द्राक्षे, तूर, मका, कपाशी, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहे.त्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली. त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 28.82 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीचे वाटप कधी करण्यात येणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाच्या उत्तरात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील म्हणाले की,राज्यातील अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांचे थकीत देय वाटप करण्याची पूर्ण तयारी 100 दिवसांच्या रोडमॅप कार्यक्रमाअंतर्गत विभागाने केली आहे. यासंदर्भात निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याची देय रक्कम थकीत राहणार नाही, याची खबरदारी घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.