बदलाचे वारे:बालविवाहाविरुद्ध मुलींनीच थोपटले दंड; साखरपुडा मोडला, 13 गावांतील 550 मुली बनल्या फुटबॉलपटू

राजस्थानच्या अजमेर, केकरी विभागातील १३ गावांमध्ये प्रत्येक दुसऱ्या घरातील मुलगी फुटबॉल खेळते. येथे ५५० मुली फुटबॉलपटू आहेत. २४५ मुली बालविवाहाविरुद्ध लढा देत आहेत. अनेकांनी खेळण्यासाठी साखरपुडाही मोडला. सहा मुली डी-परवाना मिळवून प्रशिक्षक झाल्या. १५ मुलींनी राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. महिला जन अधिकार समितीच्या संचालिका इंदिरा पंचौली आणि समन्वयक पद्मा यांच्या माध्यमातून हा आमूलाग्र, क्रांतिकारी बदल घडला आहे. पंचौली यांनी सांगितले की, बालविवाह रोखण्यासंदर्भात मी बंगालमध्ये गेलो होतो. तेव्हा गावातील मुली शाळा सुटल्यानंतर पोलिस स्टेशनच्या मैदानात फुटबॉल खेळत असल्याचे पाहिले. त्या दप्तरामध्ये कपडे आणतात. त्यानंतर आम्ही ठरवले की, आमच्याही अजमेर जिल्ह्यात बदल घडवून आणू. त्यासाठी गावोगावी क्रीडा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. ज्या मुलींना फुटबॉल खेळायचे आहे त्यांनी यावे, अशी घोषणा करण्यात आली. अनेक मुली आल्या, पण जेव्हा सराव आणि स्पर्धांसाठी बाहेर जाण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांच्या घरच्यांनी त्यांना थांबवले. फुटबॉल हा मुलांचा खेळ आहे. हातपाय मोडले तर कोणाशी लग्न करणार? मुली गावाबाहेर गेल्यास लोक चुकीचा विचार करतील, अशी कारणे देण्यात आली. ही परिस्थिती निर्माण होईपर्यंत मुलींमध्ये फुटबॉलची आवड निर्माण झाली होती. मुली स्वतःसाठी उभ्या राहू लागल्या होत्या. हे प्रकरण पोलिस-प्रशासनापर्यंत पोहोचले. सर्वात मोठा बदल म्हणजे मुली मोकळेपणाने फुटबॉल खेळू लागल्या. राज्य स्पर्धेत जे दोन संघ फायनल खेळले ते दोन्ही संघ महिला जन अधिकार समितीने तयार केल्याचेही अनेकदा घडले आहे. आता या गावांमध्ये महिला जन अधिकार समितीचे प्रशिक्षक रोज संध्याकाळी सराव करतात. केकरीच्या मुलींवर डॉक्युमेंट्री बनवली… किकिंग बॉल्स अलीकडेच प्रसार भारतीवर निर्मात्या अश्विनी यार्दी आणि ऑस्कर विजेते गुनीत मोंगा कपूर यांचा ‘किकिंग बॉल्स’ हा ४० मिनिटांचा माहितीपट प्रदर्शित झाला. यात केकरीच्या मुलींचा संघर्ष दाखवला आहे. याला न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवासह सात पुरस्कार व अधिकृत निवडही मिळाली आहे. संघर्षाचे हे तीन टप्पे, जे मुलींनी केले पार १. चाचियावास गावात मुलींना सरकारी शाळेत फुटबॉल खेळू दिले जात नव्हते. मग त्या शेतात सराव करत. आता मेयोसह अनेक शाळा सरावासाठी त्यांना मैदान उपलब्ध करून देत आहेत. २. फुटबॉल हा फक्त मुलांचा खेळ आहे. हा विचार मोडीत काढण्यासाठी मुलींनी रात्रंदिवस मेहनत केली. आता या १३ गावांत मुलींचा आदर्श घेऊन मुलेही फुटबॉल खेळू लागली आहेत. ३. अनेक मुलींच्या आयुष्यातही हा क्षण आला, जेव्हा त्यांना त्यांच्या बालपणी लग्नात मिळालेला नवरा किंवा फुटबॉल यापैकी एकाची निवड करायची होती. पण प्रत्येकाने फुटबॉलची निवड केली. त्या राष्ट्रीय व राज्याच्या खेळाडू बनल्या. मी बारावीत आहे. माझंही लग्न होणार होतं. मी नकार दिला. मी फुटबॉल खेळायला सुरुवात केली तेव्हा गावात शॉर्ट‌्स घालणेही अवघड होते. मला प्रशिक्षक बनायचंय. – सावित्री, चाचियावास वयाच्या १७ व्या वर्षी लग्न झाले. पण मला फुटबॉल व अभ्यास करण्यापासून कुणी रोखणार नाही, अशी अट मी ठेवली. आज मी डी- लायसन्स घेतले. प्रशिक्षक झालेेय. – पिंकी गुर्जर, तेवडोंची ढाणी वयाच्या ९व्या वर्षी लग्न झाले. पण मी फुटबॉल खेळणे सोडले नाही. राज्य,राष्ट्रीय चषके मिळू लागली आहेत. तेव्हा घरच्यांचा आत्मविश्वास वाढला. मी प्रशिक्षक होईन. – पायल प्रजापती, चाचियावास ५ वीत असताना लग्न झाले. दहावीत फुटबॉलमधील करिअर दिसू लागले. कायद्याच्या मदतीने बालविवाह थांबला.आज मी बंगळुरूत वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करतेय. – सुमित्रा मेघवाल, हासियावास

Share