अभंग, भारूड, जात्यावरची ओवी यांसह वासुदेव, गोंधळी, कडकलक्ष्मी ही लोप पावत असलेली महाराष्ट्राची मराठी संस्कृती पुणेकरांसमोर सादर झाली. डॉ. भावार्थ महाराज देखणे यांसह ३० ख्यातनाम वादक व कलाकारांनी ‘बहुरूपी भारूड’ मधून आपल्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवले. चातुर्मास महोत्सवाच्या निमित्ताने झालेले हे सादरीकरण म्हणजे रसिकांसाठी अनोखी पर्वणी ठरली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने टिळक स्मारक मंदिरात आयोजित चातुर्मास महोत्सवात डॉ. भावार्थ महाराज देखणे आणि ३० कलाकारांच्या बहुरूपी भारूड या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांच्या हस्ते डॉ. भावार्थ देखणे यांचा सन्मान करण्यात आला. कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी सोहळ्याने झाली. त्यानंतर संत नामदेव महाराजांचे विविध अभंग सादर झाले. भारूडाचे सादरीकरण हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. डॉ. भावार्थ देखणे यांनी सादर केलेले वासुदेव, कडकलक्ष्मी याला रसिकांनी भरभरून दाद दिली. भारतीय संस्कृती व परंपरा संपन्न असून यामध्ये अनेक कला जोपासल्या गेल्या आहेत. त्या लोककलांमधील भारूड ही प्राचीन कला. त्यामुळे ही कला यानिमित्ताने उपस्थितांना अनुभवायला मिळाली. पारंपरिक गोंधळ सादर होताच रसिकांनी टाळ्यांनी साथ दिली. अवधूत गांधी, पांडुरंग पवार, अभय नलगे, ऋषीकेश कानडे, ओंकार दसनाम, राजेंद्र बघे,प्रसाद भांडवलकर, सारंग भांडवलकर, अझरुद्दीन शेख असे तब्बल ३० कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. गायक अवधूत गांधी यांनी सादर केलेल्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. पूजा देखणे यांनी निवेदन केले.