आपल्या देशात जगताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. काही वेळा तर सरकार आणि प्रशासन यांची मदतही मिळत नाही. त्यामुळे किमान मृत्यूनंतर तरी मृतदेहावर चांगल्या पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत, अशी अपेक्षा असते. त्यासाठी अनेक गावांत स्मशानभूमीची मागणी केली जाते. पण दुर्दैवाने, अजूनही बऱ्याच गावांमध्ये स्मशानभूमीची सोय नाही. मात्र, बीड जिल्ह्यातील एका गावात वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते. या गावात लाखो रुपये खर्च करून स्मशानभूमी बांधली, पण गेल्या आठ वर्षांपासून तिथे एकाही मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेला नाही. बीड जिल्ह्यात 656 गावांमध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे मृतदेहांची विटंबना झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दुसरीकडे, बीड तालुक्यातील महाजनवाडी गावातील ही स्मशानभूमी चर्चेचा विषय बनली आहे. आठ वर्षांपूर्वी बांधलेल्या या स्मशानभूमीत कोणीही अंत्यसंस्कार केलेला नाही. त्यामुळे, अंत्यसंस्कारासाठी उभारलेला लोखंडी सांगाडा देखील गायब झाला आहे. यामागचं नेमकं कारण काय, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. बीड जिल्ह्यातील महाजनवाडी गावात आठ वर्षांपूर्वी 8 लाख रुपये खर्चून स्मशानभूमी बांधण्यात आली. या गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. मात्र, ही स्मशानभूमी गावापासून अडीच किलोमीटर दूर असल्याने ती कधीही वापरली गेली नाही. यामुळे, गावातील लोक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी इतक्या लांब जाण्याऐवजी, गावाशेजारील मोकळ्या जागेतच अंत्यसंस्कार करतात. यामुळे बांधून तयार असूनही ही स्मशानभूमी गावाच्या काहीच कामाची ठरली नाही. गावामध्ये स्मशानभूमीची गरज असूनही ती जर गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर बांधली, तर तिचा वापर कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही स्मशानभूमी गावकऱ्यांच्या सोयीसाठी बांधली आहे की कंत्राटदारांच्या फायद्यासाठी, अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करणाऱ्या प्रशासनाने किमान अशा कामांमध्ये तरी मर्यादा ठेवावी, असे संतप्त मत गावकऱ्यांनी मांडले आहे. बीड जिल्ह्यातील 1394 गावांपैकी तब्बल 656 गावांमध्ये स्मशानभूमी नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक अडचणी येतात. मात्र दुसरीकडे, महाजनवाडीतील गावकऱ्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, शासनाने महाजनवाडीमध्ये बांधलेली स्मशानभूमी म्हणजे केवळ सरकारी पैशांचा अपव्यय आहे. शासनाच्या अनागोंदी कारभाराचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही गावकरी म्हणतात.