बीडमध्ये तरुणाचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू:संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती म्हणत अंजली दमानिय आक्रमक, सरकारवर केली टीका

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये आणखी एक खुनाची घटना उघडकीस आली आहे. एका ट्रक चालकाला कुटुंबातील लोकांनी दोन दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ट्रक चालकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आष्टीतील ही घटना म्हणजे संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. अंजली दमानिया म्हणाल्या, विलास बनसोडे नावाचा 23-24 वर्षाचा मुलगा हा क्षीरसागर कुटुंबाकडे चार वर्षांपासून ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायचा. दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याला मारहाण करून त्याचा मृतदेह रुग्णालयात टाकून ती माणसे गायब झाली. त्यानंतर त्याचा मृतदेह रुग्णालयातून घेऊन जाण्यासाठी त्याच्या घरच्यांना कळवण्यात आले. त्याचे फोटो बघून पुन्हा हादरून निघालो आहोत. जसे संतोष देशमुखांचे फोटो होते, अगदी तसेच चित्र समोर आले आहे. हे सगळे बघून काय बोलावे तेच कळत नसल्याचे दमानिया म्हणाल्या. अंजली दमानिया यांनी शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणावरही आपली प्रतिक्रिया दिली. काल एका शिक्षकाने स्वतःला बँकेसमोर गळफास लावून घेत आपले जीवन संपवले. संस्था चालकाकडे पगार मागितला म्हणून त्याने शिक्षकाला सांगितले “तू फाशी घे. म्हणजे तूही मोकळा आणि आम्हीही मोकळे.” सरकार काय करत आहे? सरकार काही पाऊले का उचलत नाही? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. त्या शिक्षकाची तीन वर्षांची मुलगी आणि त्याचे वयोवृद्ध आई-वडील आहेत, त्यांचे पुढे काय? 6 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या काळात त्या शिक्षकाने आझाद मैदानावर आंदोलन केले. काय मिळाले त्यातून? शेवटी त्याला प्राण द्यावे लागले, असे दमानिया म्हणाल्या. अजित पवार कसले पालकमंत्री? सरकार आणि विरोधी पक्ष यावर चर्चा का करत नाहीत? कबर, झटका, हलाल हे काय चाललंय? इकडे लोक मरत आहेत, आणि तुम्ही नाटके करत आहात, अशा शब्दांत दमानिया यांनी सरकारवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात काहीतरी बोलले पाहिजे. बीड जिल्ह्यात बदल झाला पाहिजे. अजित पवार कसले पालकमंत्री? ते फक्त एकदाज बीडला येऊन गेले. त्यानंतर त्यांच्याकडून एक चकार शब्द ऐकलेला नाही. जे मेले त्यांची नावे अजित पवारांना माहिती सुद्धा नाहीत, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. पवारांनी मुंडेंना तिथल्या तिथे धडा शिकवायला हवा होता अंजली दमानिया म्हणाल्या, शरद पवार म्हणाले, धनंजय मुंडेंना आम्ही अनेक वेळा पाठीशी घातले, काय काय त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या. का तुम्ही त्यांच्या गोष्टी पाठीशी घातल्या होत्या? धनंजय मुंडे यांना तिथल्या तिथे शरद पवारांनी धडा शिकवला असता तर आज हे सगळे घडताना दिसले नसते. बीड मधील जितके आमदार आहेत, एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे त्यांच्या पक्षातले होते. शरद पवार यांनी त्यांना काय केले, त्यांनी काय शिकवले. आत्ता देखील मला जे तिसरा प्रकरण कळले आहे, शिवसेना उबाठा गटाचे काय कारवाई करतील. ज्याप्रमाणे शिंदे गटातील व्यक्तींना मी सांगून तो बोर्ड उतरवला आणि त्यांचे घर त्यांना परत मिळवून दिले, जर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली तरच हे सगळे बंद होईल. सगळ्या पक्षांना गरज आहे की, त्यांनी सगळ्यावर कारवाई करावी आणि जो चुकीचा वागेल त्याच्यावर कठोर कारवाई करणं हे प्रत्येक पक्षाकडून अपेक्षित आहे. जर हे होत नसेल, हे थांबत नसेल, तर या पक्षांवर बहिष्कार टाका अशी देखील मागणी करणे गरजेचे आहे असे म्हणत अंजली दमानिया आक्रमक झाल्याचा पाहायला मिळाले. बीडमधील सर्व पोलिस स्टाफ नव्याने आणण्याची गरज आता या सर्व प्रकरणांमध्ये कोणाची भेट घेण्यात मला काहीच वाटत नाही. सगळ्यांची भेट घेऊन देखील तीन महिने कोणीच काही कारवाई केली नाही. आता मी कोणाचीही भेट घेणार नाही. मला फक्त वाटते की, हे सगळे थांबले पाहिजे. गृहमंत्र्यांनी हे सगळे थांबवले पाहिजे आणि पहिले तर पूर्ण बीड पोलिस विभाग आहे त्याला बीड जिल्ह्याच्या बाहेर टाकून सर्व पोलिस स्टाफ नव्याने आणण्याची गरज आहे आणि तसे निर्देश गृहमंत्र्यांनी द्यावे, अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले. जातीची नाही तर प्रवृत्ती बदलायची गरज बीड पोलिसांनी आपल्या नेमप्लेटवरती फक्त आपले नाव लावायचे आडनाव लावायचे नाही यावर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, तिथे सगळ्यांना सगळ्यांची जात माहिती आहे. आता आपण या सर्वांत जातीपातीत नको पडूया. आत्तापर्यंत जी जी प्रकरणे समोर आली ती सर्व जातीच्या लोकांचे आहेत. सगळ्या जातीतल्या लोकांनी सगळ्या जातीच्या लोकांना मारले आहे. त्यामुळे तिथे जातीची नाही तर प्रवृत्ती बदलायची गरज आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

  

Share