भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाच्या पदाधिकारी व संचालकांची चौकशी होणार:आर्थिक गुन्हे शाखेकडे गैरविनियोग केल्याबाबतची तक्रार
भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ मर्यादित भंडाराच्या विद्यमान संचालक मंडळाने केलेल्या गैरप्रकाराचा जाब आता द्यावा लागणार आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा ठपका महाराष्ट्र शासन प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी (नागपूर) यांनी भंडारा जिल्हा प्राथमिक दुग्ध सहकारी संस्था संघटनेचे अध्यक्ष संजय तळेकर यांच्या १५ मे २०२४ रोजीच्या तक्रारीनुसार ठेवला आहे. याच तक्रार व लेखा परिक्षण अहवालाच्या आधारावर विशेष लेखापाल पुणे यांच्याकडून दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचे पदाधिकारी व संचालकाविरूध्द गैरविनियोग केल्याबाबतची तक्रार आर्थिक गुन्हे शाखा भंडारा यांना प्राप्त झाली आहे. दरम्यान, प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार दुग्ध संघाच्या पदाधिकारी व संचालकांना त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखा भंडारा येथे शुक्रवार, 21 मॉर्च 2025 रोजी हजर राहण्याची नोटीस सहायक पोलिस निरीक्षक संदीप मिश्रा यांनी बजावली आहे. त्यामुळे पांढऱ्या दुधाच्या काळ्या कहाणीचा पर्दाफाश होणार काय? भुकटीत रंगलेला दूधाचा खेळ जनतेसमोर येणार काय? अशा नानविध चर्चांना जिल्ह्यात ऊत आला आहे. विशेष म्हणजे, मागील कोरोना काळात भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाला शासनाने लाखो लिटर दूध पुरविले. त्या दूधाची पावडर तयार करून ती पावडर शासनाला द्यावयाची होती. तशा अटी आणि शर्तीही शासन आणि दुध उत्पादक संघामध्ये झाल्या होत्या. मात्र, दुध उत्पादक संघाने शासनाकडून लाखो लिटर दूध घेवून सुच्दा शासनाला त्या दूधाची भुकटी पुरवलीच नाही. दुग्ध संघाने त्या भुकटीची परस्पर विल्हेवाट लावून त्याचा येणारा पैसाही गिळंकृत केला. सर्व पुराव्यानिशी दुग्ध संघावर ७८ कारवाई झाली असून दुग्ध संघावर ८८ ची कारवाई कारवाही करण्यात आली. त्यानुसार विशेष लेखा परिक्षण देखील करण्यात आले. या सर्व चौकशीत दुग्ध उत्पादक संघाने मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रूपयाची हेराफेरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार विशेष लेखा परिक्षक यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी भंडारा पोलिस स्टेशनला जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचे अध्यक्ष व कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात पुराव्यानिशी आरोप करत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मात्र, फिर्याद दिल्यानंतरही पोलिस प्रशासन सुस्त असल्याने तर्क वितर्कांना उधाण आले असून राजकिय दबाबापोटी हे प्रकरण दाबण्याचा प्रकार तर सुरु नाही ना असा प्रश्न जनसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. भंडारा दुग्ध संघाचा गैरव्यवहार चव्हाट्यावर विशेष म्हणजे, संजय तळेकर यांच्या तक्रारीनुसार, भंडारा जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थेचे २०१९ पासून जवळपास १४ ते १५ हप्ते चुकारे संघाकडे बाकी आहेत. परंतु, फक्त दूध संघाचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी कार्यकारी संचालकांची मदत घेऊन स्वतःच्या संस्थेचे थकीत चुकारे काढून घेतले आहेत. परंतु, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. संचालक मंडळ फक्त जवळच्या नातेवाइकांच्या संस्थेचे चुकारे देण्याचे काम करीत आहेत. जेणे करून निवडणुकीत त्याचा लाभ होईल अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांचे मनमर्जीप्रमाणे काम सुरू आहे. त्यामुळे भंडारा दुग्ध संघ पुन्हा डबघाईस जात आहे. अशा तक्रारीवरून दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत असलेले जवळपास १४ ते १५ चुकारे क्रमप्राप्त पद्धतीने काढले नसल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. लेखापरीक्षण अहवालातूनही खरे चित्र उघडकीस जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-२, सहकारी संस्था (पदुम) भंडारा यांच्या प्राप्त छाननी अहवालानुसार २०२२-२३ च्या लेखापरीक्षण अहवालात प्राथमिक दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांना दूध पेमेन्टमध्ये ८.४८.५९,०७४ रुपयांच्या ताळेबंदानुसार प्राथमिक दूध संस्था दूध खरेदी पोटी देणे नमूद आहे. परंतु, त्याच अहवालात शासन घेणे व प्राथमिक दूध संस्था देणे तोट्याची रक्कम रुपये १३,४२,३९,२६४ देणे दर्शविलेले आहे. परंतु, या तोट्याची रक्कम किती संस्थांना व कशापोटी देणे आहे, याबाबत मूळ लेखापरीक्षण अहवालामध्ये वस्तुस्थितीदर्शक असे कोणतेच शेरे नमूद केले नाहीत आणि लेखापरीक्षकाने वस्तुस्थितीजन्य व खरे चित्र उघडकीस आणले नाही. लेखापरीक्षण अहवालात विसंगती व मोघम लिखाण लेखापरीक्षण अहवालातील बँकेतील शिल्लक या शीर्षका अंतर्गत बँक शिल्लकेतील नमूद केलेल्या तक्त्यानुसार भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक भंडारा खाते क्र. ४२० चे बैंक पासबुक व बँक बाकी प्रमाणपत्र सादर केले नसल्याबाबत लेखापरीक्षकाने शेरे नमूद केले आहेत. मात्र, नमूद तक्त्यानुसार बँक पासबुकाप्रमाणे बाकी नमूद करण्यात आली आहे. बँकेचे पासबुक व बँक बाकी प्रमाणपत्राअभावी ३१ मार्च २०२३ अखेरची आकडेवारी कशी काय नमूद करण्यात आली, या बाबतच्या लिखाणात विसंगती व मोघम स्वरूपाचे लिखाण दिसून येत आहे. सोबतच लेखापरीक्षण अहवालात संस्थेने आमसभेत पुढील आर्थिक वर्षाकरिता संस्थेच्या प्रगती व व्यवस्थापनाव्या दृष्टिकोनातून नियमानुसार अंदाजपत्रक मंजूर करणे आवश्यक आहे. त्यानुसार अंदाजपत्रकाप्रमाणे पुढील वर्षीचा लक्ष्यांक गाठणे संस्थेच्या हितावह ठरेल, याबाबत लेखापरीक्षकाने कोणत्याच प्रकारचे शेरे नमूद केलेले नाहीत दोन दिवसात चौकशीला बोलावणार या प्रकरणाबाबत आर्थिक गुन्हेशाखा भंडाराचे पोलिस निरिक्षक संदीप मिश्रा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता मी नवीन असल्याने या प्रकरणाबाबत दोन दिवसात आरोप करण्यात आलेल्या व्यक्तींना बोलावून या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात करणार व लवकरच या प्रकरणाला योग्य न्याय देण्याचे काम करणार असल्याचे सांगितले. तक्रार दाखल झाली जिल्हा दुग्ध उत्पादक संघाबाबत गुन्हे दाखल होणार अशी माहिती मिळताच या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी भंडारा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक गोकुळ सुर्यवंशी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क सांधला असता त्यांनी ही तक्रार गुन्हे शाखा विभागाकडे वळते केले आहे असे सांगितले.