गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने विरोधी पक्षातील अनेक पदाधिकारी सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. याचा मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला बसत आहे. नाशिकनंतर आता कोकणातीलही काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित एका मेळाव्यात शिवसेना नेते भास्कर जाधव यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा मुलगा विक्रांत जाधव भाषण करत असताना, भास्कर जाधव भावूक झाल्याचे दिसून आले. याआधीही एका मेळाव्यात त्यांना असे अश्रू आवरता आले नव्हते. राजकीय घडामोडींमुळे त्यांना झालेल्या वेदना यातून दिसून येतात. वेळणेश्वर येथे आयोजित एका मेळाव्यात त्यांचा मुलगा विक्रांत जाधव भाषण करत असताना, जाधव यांचे डोळे पाणावले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर आणि सदस्य नेत्रा ठाकूर यांनी त्यांची साथ सोडल्यानंतर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. विक्रांत जाधव आपल्या भाषणात, ‘आपल्यासोबत घात नाही, तर विश्वासघात झाला आहे,’ असे म्हटल्यावर भास्कर जाधव यांचा कंठ दाटून आला. त्यांनी टॉवेलने डोळे पुसले. याआधीही जाधव यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या. महाविकास आघाडीत मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांच्या पक्षांतराचीही जोरदार चर्चा सुरू झाली होती. मोलकरणीच्या लग्नातही झाले होते भावुक आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या घरकाम करणाऱ्या सुप्रियाच्या लग्नासाठी सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले. मे महिन्यात असलेल्या या लग्नासाठी ते पत्नी, मुले, पुतणे आणि सुनांसमवेत पांगारी गावातील सडेवाडी येथे पोहोचले. लग्न पार पडल्यानंतर जाधव कुटुंब जेव्हा सुप्रियाला भेटायला गेले, तेव्हा हा क्षण अत्यंत भावूक झाला. सुप्रियाने भास्कर जाधव यांच्या पत्नी सुवर्णाताई आणि सून स्वरा यांना कडकडून मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बापाचं प्रेम देणाऱ्या भास्कर जाधवांचाही कंठ दाटून आला आणि त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू तरळले. आपुलकीच्या या नात्याची साक्ष देणारा हा हळवा क्षण पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.