रामटेकमधील बंडखोरीवरुन भास्कर जाधवांनी काँग्रेसला सुनावले:बंडखोरावर कारवाईच्या मागणीची गरज काय; ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का?

रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाईच्या मागणीची गरज काय; ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का?, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी काँग्रेसला सुनावले आहे. रामटेकमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई न करण्यात आल्याने ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. भास्कर जाधव म्हणाले की, मी याकडे दुःखाने, वेदनेने बघतो. पूर्व विदर्भात 28 जागा आहेत. यापैकी 14 जागा भाजप शिवसेनेने 2019 मध्ये जिंकल्या होत्या. त्यातील किमान 8 ते 10 जागा मिळतील, असा माझा अंदाज होता, प्रयत्न होता. पण, केवळ 1 जागा मिळाली. त्याही जागेवर काँग्रेसने बंडखोरी करावी आणि काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी ती बंडखोरी करावी आणि आजपर्यंत काँग्रेसने त्यांच्यावर कुठलीही कारवाई करू नये याच्यासारखं वेदनादायी प्रकरण दुसरे नाही. जागा सोडायचे हे फळ मिळणार का? भास्कर जाधव म्हणाले की, नागपूर काँग्रेसचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केली आहे. रामटेकसारखी सात्यत्याने जिंकून येणारी जागा आम्ही काँग्रेसला दिली हे सांगण्यात काही अर्थ नाही. पण त्यांचे जर आम्हाला हे फळ मिळणार असेल तर माझ्यासारखा कार्यकर्त्याला वेदना होतात. प्रत्येक जिल्ह्यात कितान 1 तरी जागा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न केले. माझ्या युवा सहकाऱ्यांचा माझ्यामुळे अपेक्षाभंग झाला ते सर्व जण आस लावून होते की प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा तरी आपल्याला मिळेल.
काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का? भास्कर जाधव म्हणाले की, आम्ही कारवाईची मागणी करण्याची काय गरज आहे. त्यांची नैतिक जबाबदारी नाही का असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. या बंडखोरीच्या मागे इथले काँग्रेसचे काही नेतेमंडळी आहेत. म्हणून ही बंडखोरी झालेली आहे. आमच्या पक्षाने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे.आमच्या उमेदवाराला फटका बसेल की नाही, हे मतदार ठरवतील; पंरतू असं मैत्रीमध्ये, आघाडीमध्ये वर्तन चांगलं आहे, असं मला वाटतं नाही. हे वर्तन सातत्याने काँग्रेसकडून होतंय, असा माझा आरोप आहे. विशाल बरबटे हे निवडून येतील. पण, निवडून येत असताना मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणे, हे मला मान्य नाही.

  

Share