मोठी बातमी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंनी घेतली भेट; दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 15 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आज नागपूर येथे पोहोचले आहेत. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. वास्तविक परंपरेप्रमाणेच ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे विधान भवन परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा देखील झाली. मात्र या चर्चेमध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदाचा कोणताही मुद्दा चर्चेत आला नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. मात्र मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर फडणवीस आणि ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब हे देखील उपस्थित होते. तीन वर्षांनंतर नार्वेकरांच्या भेटीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट घेतली. या भेटीत देखील विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूंत्राने दिली आहे. राहुल नार्वेकर आणि उद्धव ठारके यांच्यात तब्बल तीन वर्षानंतर ही भेट झाली आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. परंपरेनुसारच ठाकरे हे फडणवीस यांच्या भेटीसाठी – दरेकर
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणे ही परंपरा आहे. या परंपरेनुसारच उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. यामध्ये कोणताही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमंशी बोलताना सांगितले. माझी देखील विधानभवनाच्या पायरांवर उद्धव ठाकरेंसोबत अचानकपणे भेट झाली. मात्र राजकारण वेगळे आणि वैयक्तिक संबंध वेगळे असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.

  

Share