भाजपचे 2 आमदार अडचणीत:समीर मेघे आणि चरणसिंह ठाकूर यांना उच्च न्यायालयाची नोटीस; नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

नागपूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन आमदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे आणि काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरणसिंह ठाकूर हे अडचणीत सापडले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या वतीने या दोन्ही आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आगामी तीन आठवड्यांच्या आत आपला जबाब नोंदवण्याचे निर्देश देखील खंडपीठाने दिले आहेत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगणा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार समीर मेघे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पराभूत उमेदवार रमेशचंद्र बंग यांनी याचिका दाखल केली आहे. तर काटोल विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार आमदार चरणसिंह ठाकूर यांच्या विरोधात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार सलील देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही आमदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. तसेच त्यामुळे या दोन्ही आमदारांची निवड अवैध ठरवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याच याचिकेनुसार आता समीर मेघे आणि आमदार चरणसिंह ठाकूर यांना नागपूर खंडपीठाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता या नोटिसीवर हे दोन्ही आमदार नेमके काय उत्तर सादर करतात? त्यावर नागपूर खंडपीठ काय निर्णय घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माजी गृहमंत्र्यांचे पुत्र आहेत सलील देशमुख माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांनी आपला मुलगा सलील याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रसे शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनिल देशमुख यांनी पहिल्या यादीतच काटोलमधून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अनिल देशमुख यांनीच सलीलच निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. सलील देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरते वेळी अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी निवडणूक न लढण्याचे कारण सांगत भाजप वरही जोरदार हल्लाबोल केला होता. मी निवडणूक लढत नसलो तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मी मंत्री होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

  

Share