भाजपने हिंदू मुस्लिम करून महाराष्ट्राची एकता तोडू नये:देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीवर टीका केली होती. धर्माचा वापर करून महाविकास आघाडीचे नेते वोट जिहाद करत आहेत. निवडणुकीच्या काळात इतके लांगूलचालन यापूर्वी कधी बघितले नव्हते, अशी टीका त्यांनी केली होती. यावर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, एखादी मुस्लीम संघटना एखाद्या पक्षाला मतदान करण्यासाठी आवाहन करत असेल, तर यात गैर काय? अशाप्रकारे आवाहन करणे चुकीचे असेल तर मग आरएसएस सुद्धा धार्मिक संघटना आहे. ही संघटना भाजपाचा प्रचार करते. त्याचे काय? भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणतात, की त्यांना आरएसएसची गरज नाही. मग आरएसएसचे लोक कशाला प्रचारासाठी मैदानात उतरतात? याचे उत्तर आधी देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असे पटोले म्हणाले आहेत. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, जेव्हा जेव्हा निवडणुका येतात एव्हा भाजपचे नेते हिंदू मुस्लिम करतात. पण ज्यावेळी ईद येते त्यावेळी हेच नेते मुस्लिमांकडे जाऊन बिर्याणी खातात. त्यामुळे या पद्धतीच्या चर्चा आता भाजपच्या नेत्यांनी थांबवल्या पाहिजेत. त्यांनी हिंदू मुस्लिम करून महाराष्ट्राची एकता तोडू नये, असा सल्ला देखील नाना पटोले यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उलेमा कौन्सिलने महाविकास आघाडीला 17 मागणीचे पत्र दिले आहे. त्यात मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली असल्याचे सांगितले होते. यावर पटोले म्हणाले, आमच्याकडे खूप पत्र येतात. त्यातल्या कोणत्या अटी मान्य करायच्या आहेत ते आम्हाला ठरवायचे आहे. काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, उलेमा कौन्सिलने महाविकास आघाडीला १७ मागणीचे पत्र दिले आहे. या मागण्या इतक्या भयानक आहे की त्यात दहा टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवाय देशावर व राज्यात जे दंगे भडकविण्यात आले होते अशा दंग्यातील जे मुस्लिम आरोपी आहे त्यांच्यावरील केसेस परत घ्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. पुढे ते म्हणाले, उलेमा बोर्डाने दिलेल्या मागण्या महाविकास आघाडीने त्या मान्य केल्यानंतर उलेमा बोडार्ने त्यांना पाठिंबा दिला आहे. मुस्लिमांची मते मिळावी यासाठी महाविकास आघाडी कुठल्या स्तरावर जाऊ शकतात. महाविकास आघाडीचे व्होट जिहाद सुरू केल आहे. एका धर्माला हाताशी धरुन ज्या पद्धतीने महाविकास आघाडी राजकारण करत आहे. त्याला निश्चितपणे आम्ही उत्तर देऊ. राज्यातील जनतेने सावध राहून मतदान करण्याची वेळ आली आहे. सर्वाना एक व्हावे लागेल तरच देश सुरक्षित राहील.

  

Share